विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार

मोफत करिअर मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एच आर न्यूज मराठी | प्रतिनिधी | पिंपरी, दि. ७ जून २०२६ : आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, या उद्देशाने समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, बौद्ध समाज मंच, परिवर्तन युवा एकता, सूर्योदय बहुउद्देशीय संस्था आणि नीलरत्न युवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मानुस्मृती विहार, बौद्ध नगर, रिव्हर रोड, पिंपरी येथे दिनांक ७ जून रोजी पालक व विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात राहुल शेलार, डॉ. दिपाली धाईंजे, फरहाना अलमेल, मुस्तफा तांबोळी, शेखर कांबळे आणि प्रशांत प्रबोध यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच समाजसेवक जीतूभाऊ गुरुबक्ष पेहलानी यांचे विशेष सहकार्य लाभले.पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वाटचाल कशी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, भविष्यातील करिअरच्या संधी कोणत्या आहेत, बदलत्या काळात कोणती कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. याबाबत मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.राहुल शेलार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील करिअर संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थी स्वतःची प्रगती कशी साधू शकतात याचे त्यांनी प्रभावी उदाहरणांसह विवेचन केले. डॉ. दिपाली धाईंजे यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन करत पालकांनी मुलांशी सकारात्मक संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासवृद्धीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले.शिबिराचे विशेष आकर्षण ठरलेल्या फरहाना अलमेल यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) तसेच संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. एनडीएमध्ये प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, तयारीचे नियोजन आणि देशसेवेच्या संधी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या उत्साही, प्रेरणादायी आणि संवादात्मक शैलीमुळे विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध प्रश्न विचारले. त्यांच्या भाषणामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संरक्षण क्षेत्रात करिअर घडविण्याची प्रेरणा निर्माण झाली.
मुस्तफा तांबोळी यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षा, त्यांचे महत्त्व, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ कसा घ्यावा याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या झाल्या.शेखर कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून ध्येय निश्चित करण्याचा संदेश दिला, तर प्रशांत प्रबोध यांनी शिक्षणासोबत सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जीतूभाऊ गुरुबक्ष पेहलानी यांच्या हस्ते शालेय बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे योगेश वडमारे, भाऊसाहेब निकम आणि पुण्यकुमार इंगवले, विशाल गायकवाड, भीम गायकवाड, चंद्रकांत सोनवणे, विनय सोनावणे, सागर सूर्यवंशी, सुनील गायकवाड, अनिल कडाळे ॲड. सुप्रिया गायकवाड यांचे विशेष परिश्रम लाभले. कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय, जनजागृती आणि व्यवस्थापन यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांना करिअरची दिशा, पालकांना मार्गदर्शन आणि समाजाला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे शिबिर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणादायी ठरले. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.