किशोर आवारे खून खटला: साक्षीदारांवर राजकीय दबाव.
बंदुकीचा धाक आणि जीवे मारण्याच्या धमक्या; वडगाव मावळ न्यायालयात खळबळजनक खुलासे!
मावळ (पुणे) दि. १३ : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय किशोर आवारे यांच्या बहुचर्चित आणि थरारक खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि इतर महत्त्वाच्या साक्षीदारांवर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव आणला जात असून, बंदुकीचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची गंभीर बाब आता अधिकृतपणे न्यायालयीन नोंदीवर आली आहे. या खुलाशांमुळे संपूर्ण मावळ तालुक्यासह राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील एफआयआर क्रमांक २३३/२०२३ अंतर्गत किशोर आवारे खून प्रकरणाची नियमित सुनावणी सध्या वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीदरम्यान गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी आणि इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवली जात असताना हे धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आले. साक्ष फिरवण्यासाठी साक्षीदारांना थेट पिस्तुलाचा धाक दाखवणे, राजकीय बड्या धेंडांकडून धमकावणे आणि जिवे मारण्याचे इशारे देणे यांसारख्या गंभीर बाबी साक्षीदारांनी थेट न्यायालयासमोर मांडल्या आहेत. या सर्व बाबी न्यायालयाने अत्यंत गांभीर्याने नोंदवून घेतल्या आहेत.
किशोर आवारे यांच्या भरदिवसा झालेल्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या खटल्यातील मुख्य साक्षीदारांनाच अशा प्रकारे धमकावून खटला कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे उघड झाल्याने साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयीन नोंदीवर आलेल्या या गंभीर बाबींनंतर आता प्रशासन आणि न्यायालय साक्षीदारांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्याबाबत तसेच दबाव आणणाऱ्यांवर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.