भंडारा डोंगराच्या पायथ्याशी १ हजार रोपांचे वृक्षारोपण..

मराठवाडा जनविकास संघासह विविध संस्थांचा पुढाकार
पुणे / मावळ दि. १३:
निसर्गाचा समतोल राखणे, वाढते प्रदूषण रोखणे आणि भावी पिढीसाठी हिरवेगार भविष्य निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठवाडा जनविकास संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जांबवडे येथील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी १ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड म्हणजे केवळ हिरवाई नव्हे, तर ती भविष्यातील श्वासाची हमी आहे,” या भावनेतून उपस्थित मान्यवर व नागरिकांनी रोपे लावून त्यांच्या संवर्धनाचा संकल्प केला.
झाड लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते जगवणेही गरजेचे असल्याचे सांगत मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी आज मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व संवर्धन झाले नाही, तर भविष्यात गंभीर पर्यावरणीय संकट उभे राहील, असा इशारा दिला. पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता सातत्याने सुरू राहावी, असे मत जगन्नाथ नाटक पाटील यांनी मांडले. तसेच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे डॉ. भारती चव्हाण आणि जांबवडेचे सरपंच तानाजी नाटक यांनी नमूद केले.
हा उपक्रम श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल-रखुमाई भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट, मराठवाडा जनविकास संघ, गुणवंत कामगार कल्याण मंडळ, नवचैतन्य हास्ययोग परिवार, भारतीय योग संस्थान, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, जनकल्याण प्रतिष्ठान, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ आणि अ रे ऑफ होप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद पाटील, सचिव जोपाशेठ पवार, विश्वस्त जगन्नाथ नाटक, इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे, पंचायत समिती सदस्य दिलीप ढोरे, माजी चेअरमन अरविंद शेवकर, ह.भ.प. रामभाऊ कराळे, ह.भ.प. बाळकृष्ण भोरकडे, वडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे व मल्लिनाथ हिरेमठ, निगडेच्या वन अधिकारी मंगल दाते/ढोरे, रमेश ठोंबरे, तसेच बाळासाहेब साळुंके, मोहम्मदशरीफ मुलानी, डॉ. नंदकुमार धुमाळ, दिनेश पवार, पांडुरंग सुतार, शंकरराव सावंत, शिवाजी साळुंखे, प्रकाश इंगोले, महादेव स्वामी आणि किशोर अट्टरगेकर यांच्यासह ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.