Uncategorized

अश्लील डीजे डान्सविरोधात पुण्यात कायद्याचा बडगा..

अभिनेत्री टीना शर्मा घेवारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश!

​पुणे/पिंपरी दि. ११ : सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रमांमधील अश्लील तसेच विभत्स डीजे नृत्यांवर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश मिळाले आहे. पुणे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईचे स्वागत करत, हीच धडक मोहीम आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.​

प्रशासनाकडून ठोस कारवाई, लढ्याला मिळाले फळ गेल्या काही काळापासून सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील व विभत्स नृत्यांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिमेला गालबोट लागत होते. याविरोधात टीना शर्मा घेवारे यांनी गृह विभाग, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे पोलीस आयुक्तालयाकडे सातत्याने निवेदने देऊन कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती. या पाठपुराव्यामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अखेर प्रशासनाने या प्रकारांची दखल घेत कारवाईचा पाऊल उचलल्याने या लढ्याला मोठे यश आले आहे.​

संस्कृती जपण्यासाठी ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवा: टीना शर्माप्रशासनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना टीना शर्मा म्हणाल्या:​संतांच्या भूमीची प्रतिष्ठा जपणे गरजेचे: “महाराष्ट्र ही संत, महापुरुष आणि समाजसुधारकांची भूमी आहे. अशा भूमीत सार्वजनिक कार्यक्रमांत अश्लीलतेचा नंगानाच खपवून घेतला जाणार नाही.”​कारवाई केवळ पुण्यापुरती मर्यादित नको: “पुण्यातून सुरू झालेली ही मोहीम केवळ एका शहरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने राबवली गेली पाहिजे.”​आयोजक आणि कलाकारांवर वचक हवा: “कार्यक्रमांना परवानगी देताना नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. शहरांचे नाव वापरून विभत्स प्रकार करणाऱ्यांवर प्रशासनाने वचक ठेवावा.”

कलाकार, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित येऊन कठोर भूमिका घेतल्यासच सार्वजनिक कार्यक्रमांमधील अश्लीलतेला मुळापासून आळा घालता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button