कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा.

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान
पिंपरी-चिंचवड दि. १० :कष्टकरी आणि श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या साडेतीन दशकांपासून अखंड लढा देणारे ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’चे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. ऑटो क्लस्टर सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते भोसले यांना स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दिमाखदार सोहळ्यास पद्मश्री गिरीश प्रभुणे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी भोसले यांच्या निस्वार्थ आणि लढाऊ कार्याचा गौरव करत पत्रकार संघाने योग्य व्यक्तीची सन्मानासाठी निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
३५ वर्षांची अविरत कामगार सेवा यशवंतभाऊ भोसले यांनी गेल्या ३५ वर्षांत कामगारांचे कायदेशीर हक्क, योग्य वेतन आणि सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढ्यांपर्यंत सातत्यपूर्ण संघर्ष केला आहे. व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात समन्वय राखत श्रमिकांना न्याय मिळवून देणारा विश्वासू चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
“हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील अत्यंत आठवणीत राहणारा क्षण असून, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षाची ही खरी पावती आहे.”— यशवंतभाऊ भोसले, कामगारनेते
सोहळ्यातील इतर प्रमुख घडामोडी
प्रकट मुलाखत: ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, सुनील माळी, विशाल परदेशी, राज काची आणि योगेश कुटे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘आमदारांचे हेडमास्टर’ या विषयावर घेतलेली मुलाखत विशेष लक्षवेधी ठरली.इतर मान्यवरांचा सन्मान: डॉ. विजय सूर्यवंशी, डॉ. डी. के. भोसले, बाबा कांबळे, रवी घाटे आणि बाबासाहेब आवटी यांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार आणि प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी केले. या सन्मानाबद्दल राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला.