संविधान शिल्प हटविल्याप्रकरणी सांगवीतील आंदोलन तात्पुरते स्थगित.

न्यायालयीन लढ्यासह ‘संविधान सृष्टी’साठी पाठपुरावा सुरूच राहणार: नरेंद्र बनसोडे
पिंपरी-चिंचवड/सांगवी प्रतिनिधी दि. २ : सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविल्याच्या निषेधार्थ पुकारलेले आंदोलन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी न्यायालयीन लढा आणि संबंधित जागेवर ‘संविधान सृष्टी’ उभारण्यासाठीचा पाठपुरावा अखंड सुरूच राहील, असा निर्धार काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केला. सांगवी येथे आयोजित ‘संविधान सन्मान निर्धार सभे’त ते बोलत होते.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आणि मारुती भापकर यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर सर्व आंदोलकांच्या सहमतीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नेमके प्रकरण काय? : सभेत आंदोलनाचा आढावा घेताना नरेंद्र बनसोडे म्हणाले की, १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर, १५ ऑक्टोबर रोजी महापालिकेने २०२२ मध्ये उभारलेले प्रास्ताविकेचे शिल्प जेसीबीच्या साहाय्याने हटवून उद्ध्वस्त करण्यात आले. कोणतीही प्रशासकीय वर्क ऑर्डर किंवा अधिकृत आदेश नसताना हे कृत्य करण्यात आले, असा अहवाल पालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनीही पोलिसांना दिला होता.

१७ ऑक्टोबर रोजी काँग्रेसने कारवाईसाठी निवेदन दिले; मात्र कारवाई न झाल्याने २० ऑक्टोबरला पुन्हा काम सुरू होताच कार्यकर्त्यांनी सांगवी पोलीस ठाणे गाठले. २२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मिळालेल्या एफआयआरच्या प्रतीमध्ये संतोष कांबळे आणि अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. तरीही प्रत्यक्ष जेसीबी चालक, वाहन व मूळ सूत्रधारांवर ठोस कारवाई न झाल्याचा आरोप बनसोडे यांनी केला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या :
• पूर्णाकृती पुतळा: संविधान चौकात केवळ प्रास्ताविकेचे शिल्प न ठेवता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.
• संविधान सृष्टी व अध्ययन केंद्र: परिसरातील मोडकळीस आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) क्वार्टर्सच्या जागेवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र’ किंवा ‘संविधान सृष्टी’ साकारण्यात यावी.
• अभ्यासिका व वसतिगृह: विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका आणि सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय वसतिगृह उभारण्यात यावे.
• न्यायालयात दाद: नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्या कृत्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल.
या सर्व मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले असून, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, नगरविकास विभाग आणि कला संचालनालयाकडून आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : या निर्धार सभेला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा भगतसिंग परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, काँग्रेस प्रदेश सचिव अशोकराव मोरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, काँग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाचे शहराध्यक्ष रवी नांगरे, आपचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, आप महिला अध्यक्षा कविता कोंडे, स्वराज इंडियाचे प्रदीप पवार, कुणाल भोसले, बी. बी. शिंदे, अनिता सोनवणे, अनिता साळवे, डॉ. राजेश मंगल, आप्पा शिंदे, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, हरीश डोळस, रवी भोजकर, देवदत्त रानवडे, शाही ओवाळ, बाबा गायसमुद्रे, विरेंद्र गायकवाड, प्रवीण कांबळे, शाहू गायकवाड, अशोक मंगल, गौरी नरसिंगे, विलास सकट, सविता सकट, कृष्णा जाधव यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.