घरकुल येथे देशी रोपांचे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण.

समर्थ हाऊसिंग सोसायटी व वृक्षमित्र अरुण पवार यांचा पर्यावरणपूरक उपक्रम
चिखली (पिंपरी-चिंचवड) प्रतिनिधी दि. २९ : पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने चिखली येथील समर्थ हाऊसिंग सोसायटी (एफ-१६, घरकुल) आणि मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने संयुक्तपणे भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वड, पिंपळ, चिंच, आवळा, कडुलिंब, आंबा, जांभूळ, करंज यांसारख्या देशी वृक्षांसह विविध फळझाडे आणि भरपूर प्राणवायू (ऑक्सिजन) देणाऱ्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.
या उपक्रमासाठी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. घरकुल परिसरात राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे स्थानिक रहिवाशांनी मनःपूर्वक कौतुक केले. केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेली सर्व झाडे जगवून मोठी करण्याचा निर्धार सोसायटीच्या नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी समर्थ हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अशोक मगर, मीनाताई मोहिते, सुभाष लांडगे, लक्ष्मण जाधव, रंगनाथ आवारे, बिभीषण पवार, सुग्रीव पाटील, चतुरभुज चव्हाण यांच्यासह सोसायटीचे सर्व सभासद आणि स्वामी महिला बचत गट तसेच समर्थ महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अरुण पवार यांनी नुकतीच जांबवडे येथील भंडारा डोंगर पायथ्याशी १,००० झाडांची लागवड केली असून आतापर्यंत राज्यभरात ५० हजारांहून अधिक देशी व फळझाडे लावून ती यशस्वीरीत्या जोपासली आहेत. वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ते विनामूल्य रोपे पुरवून झाडे जगवण्याचा आग्रह धरतात.

“दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जगवली पाहिजेत. आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत, तेवढी झाडे प्रत्येकाने लावायला हवीत. ‘एक व्यक्ती, एक झाड’ ही संकल्पना प्रत्येक कुटुंबाला बंधनकारक करावी, यासाठी आम्ही कोरोना काळापासून जिल्हाधिकारी, वन विभाग आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने अंमलात आणल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल.”— अरुण पवार (संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ तथा वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र)