Uncategorized

देशातील सर्वोत्कृष्ट सात बालवैज्ञानिकांमध्ये झळकलेल्या गीता धनवडे हिचा पिंपरी पालिकेतर्फे गौरव.

आता जर्मनीची वारी

पिंपरी, प्रतिनिधी दि. ३१ : नवी दिल्ली येथे आयोजित ‘इन्स्पायर मानक’च्या १२ व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन करून देशातील पहिल्या सात बालवैज्ञानिकांमध्ये स्थान पटकावणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कु. गीता गणपत धनवडे हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष सत्कार करण्यात आला. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते गीताचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.​

नवी दिल्लीत १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात देशभरातून निवडक बालवैज्ञानिकांचे प्रकल्प सादर करण्यात आले होते. यात माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या गीताने सादर केलेल्या अभिनव विज्ञान प्रकल्पाने परीक्षकांची मने जिंकली. देशभरातील सर्वोत्कृष्ट सात बालवैज्ञानिकांमध्ये तिची निवड झाली असून, या यशामुळे तिला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मनी येथे जाण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.​

या यशाची दखल घेत महानगरपालिकेच्या मुख्य सभेत तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. गीताच्या या यशामुळे उद्योगनगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे व चिकाटीचे सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.​

या सत्कारप्रसंगी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुलदीप जंगम यांच्यासह विविध पक्षांचे नगरसदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. उपमहापौर शर्मिला बाबर यांनी गीताच्या भावी शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button