Uncategorized

सीना नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले.

बार्शीतील भोईंजे येथील धक्कादायक घटना, शोधकार्य सुरू

बार्शी प्रतिनिधी दि. १९ : यात्रेनिमित्त मामाच्या गावी आलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. निमगाव (मा.) परिसरातील सीना नदी पात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ५ तरुणांपैकी २ जण पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही सध्या बेपत्ता असून स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू आहे.​

यात्रेचा आनंद क्षणात हिरावला मिळालेल्या माहितीनुसार, मौजे भोईंजे (ता. बार्शी) येथे अनिल सुभाष शिरसाट यांच्याकडे यात्रेसाठी त्यांचे भाचे आले होते. हे सर्वजण ३० ऑगस्टपासून पाहुणचारासाठी भोईंजे येथे मुक्कामी होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास गावातील पाच युवक निमगाव (मा.) हद्दीतील सीना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. नदीच्या पात्रात उतरल्यानंतर पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील दोन युवक वाहून गेले, तर इतर तिघे सुखरूप बाहेर पडले.​

बेपत्ता तरुणांची नावे :​ प्रफुल्ल गोपाळ गायकवाड (वय २५ वर्षे) — मूळ गाव: घोडके प्लॉट, बार्शी (सध्या रा. कुर्ला, मुंबई) ​प्रतीक लक्ष्मण भालेराव (वय २३ वर्षे) — मूळ गाव: पाट सांगवी, ता. भूम, जि. धाराशिव (सध्या रा. कुर्ला, मुंबई)

​दोघेही तरुण मुंबईतील कुर्ला परिसरात वास्तव्यास होते आणि सण-उत्सवासाठी गावी आले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच भोईंजे व परिसरातील ग्रामस्थांनी नदीकाठी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून बेपत्ता तरुणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button