बार्शीत ८६ वर्षीय वृद्धाची दुचाकी फोडली; गुंडगिरीने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
बार्शी प्रतिनिधी १३ फेब्रु.– शांत समजल्या जाणाऱ्या बार्शी शहरात गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एका ८६ वर्षीय निरपराध वृद्धाची दुचाकी भररस्त्यात फोडल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाईकवाडी प्लॉट परिसरातील रहिवासी महादेव दत्तू मोहिते (वय ८६) हे कामानिमित्त घराबाहेर पडले होते. शिवाजी महाराज पुतळा परिसरातील एका हॉस्पिटलसमोर त्यांनी आपली दुचाकी पार्क करून भाजी खरेदीसाठी गेले असताना काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. पाहता पाहता या वादाचे रूपांतर उघड दहशतीत झाले आणि संबंधितांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली.या हुल्लडबाजांच्या रागाचा फटका कोणताही संबंध नसताना मोहिते यांच्या दुचाकीला बसला. ज्या वयात आधार, सुरक्षितता आणि सन्मानाची अपेक्षा असते, त्या वयात एका ज्येष्ठ नागरिकाला गुंडशाहीचा सामना करावा लागणे अत्यंत लाजिरवाणे आणि धक्कादायक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.ही घटना शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी घडली असल्याने पोलिसांची गस्त, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गुंडांवरील नियंत्रण याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी तोडफोड करण्याचे धाडस होत असेल, तर संबंधितांना कायद्याचा धाक उरलेला नाही, हे स्पष्ट होते.
पीडित महादेव मोहिते यांनी व्यथा मांडताना सांगितले, “मी फक्त गाडी लावून भाजी आणायला गेलो होतो. माझं कोणाशी भांडण नव्हतं. तरीही माझी गाडी फोडली. या वयात हे नुकसान मी कसं सहन करायचं?”ही केवळ एका वाहनाची तोडफोड नसून, बार्शीतील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर झालेला प्रहार आहे. सार्वजनिक शांतता भंग करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे आणि दहशत निर्माण करणे या गंभीर गुन्ह्यांखाली संबंधितांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
पोलिस प्रशासनाने तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवावी व त्यांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा अशा घटनांना खतपाणी मिळून शहरातील गुंडगिरीला बळ मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.बार्शीतील नागरिक सुरक्षित आहेत का? ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर निःशंकपणे फिरू शकतात का? या प्रश्नांची ठोस व कृतीशील उत्तरे देण्याची वेळ आता पोलिस प्रशासनावर आली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.