मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा आधार; प्रत्येकी १ लाखांची मदत

पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६ : मोशी दुर्घटनेने हादरलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर रवि लांडगे यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. वाढदिवसाचा जल्लोष टाळत त्यांनी कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्घटनेतील नऊ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये, अशी एकूण ९ लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
दुर्दैवी दुर्घटनेत कुटुंबातील आधार गमावलेल्या भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या नातेवाईकांकडे पत्रकार परिषदेत मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

“वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो; मात्र शहरातील नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना जल्लोष करणे मनाला पटणारे नाही. दुःखात असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ आहे,” अशी भावना महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली.
आर्थिक मदतीने गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून निघणार नसली, तरी संकटाच्या काळात संबंधित कुटुंबांना “तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत” हा विश्वास देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका योगिता नागरगोजे, राहुल लांडगे तसेच मृतांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.
कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू, वंचित आणि संकटग्रस्त नागरिकांना यापुढेही शक्य ती मदत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
वाढदिवसाचा जल्लोष टाळून दुःखात सहभागी होण्याचा निर्णय; महापौर रवि लांडगे यांच्या या कृतीतून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला आहे.