‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शनातून तब्बल तीन लाखांची उलाढाल


पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने भरवलेल्या १७ ठिकाणच्या प्रदर्शनांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
पिंपरी, दि. 02 नोव्हेंबर २०२५: (HRNM) पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” प्रकल्पांतर्गत दिवाळी काळात फराळ व विविध वस्तूंच्या विक्रीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या १७ ठिकाणी प्रदर्शने भरवण्यात आली होती. या प्रदर्शनांमध्ये शहरातील १०० हून अधिक महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून जवळपास ३ लाखांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत देण्यात आली आहे.या प्रदर्शनांच्या माध्यमातून स्थानिक महिलांना त्यांच्या बनवलेल्या दिवाळी फराळ व उत्पादनांच्या विक्री, ब्रँडिंग व प्रसिद्धीसाठी व्यासपीठ मिळाले. त्याचबरोबर सहभागी महिलांना व्यावसायिक संधीही उपलब्ध झाल्या. या वेळी उत्पादनांच्या विक्रीची मांडणी व व्यवस्था “सक्षम” फील्ड टीम व फेडरेशन सदस्यांनी एकत्रितपणे केली. या प्रदर्शनांना स्थानिक ग्राहकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. अनेक ग्राहकांनी या महिला-निर्मित वस्तू खरेदी केल्या व त्यातील दर्जा, पॅकिंग व सादरीकरणाबद्दल कौतुक केले. तसेच यावेळी महिला स्वयं-सहाय्यता समूहांनी सोशल मीडिया, ई-कॉमर्स अशा डिजिटल माध्यमांचा वापर करून आपला व्यवसाय विस्तारण्याचा मानस व्यक्त केला आहे……कोट बचत गटांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या महिलांचे सशक्तीकरण होण्यास मदत होते. या उपक्रमाने महिलांना एक नवीन व्यावसायिक दिशा मिळाली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी काळात या स्वयं-सहाय्यता गटांना आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी बनवण्यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे.– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका………..