पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली!
काळेवाडीत ‘कोयता’ घेऊन फिरणारा भाई जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-२ ची कडक कारवाई
काळेवाडी (प्रतिनिधी) दि. ६ : पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक शस्त्रबंदी लागू केली असतानाही, या आदेशाला पायदळी तुडवून हातात धारदार कोयता बाळगणाऱ्या एका २० वर्षीय गुंडाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. काळेवाडी स्मशानभूमीजवळ गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ही धडक कारवाई केली.
अटक केलेल्या आरोपीचे नाव:समिर शराफत उस्मानी (वय २० वर्षे, रा. चांदणी चौक, जगतापनगरजवळ, थेरगाव, पुणे)
पोलीस आयुक्तांचे आदेश झुगारले; गंभीर गुन्ह्याचा होता डाव!पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २४ जून २०२३ रोजी मध्यरात्री ००:०१ वाजेपासून ते ७ जुलै २०२६ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत (१४ दिवसांसाठी) विशेष प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात लाठ्या-काठ्या, तलवारी, बंदुका, चाकू आणि कोयते यांसारखी घातक शस्त्रे सोबत बाळगण्यास सक्त मनाई आहे.
असे कडक आदेश लागू असतानाही, आरोपी समिर उस्मानी हा ६ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास काळेवाडी स्मशानभूमीजवळ संशयास्पद रित्या फिरत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्या कब्जात एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला. प्राथमिक तपासानुसार, परिसरात एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या किंवा दहशत माजवण्याच्या उद्देशानेच तो हे घातक हत्यार घेऊन फिरत होता.
काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे घातक हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस हवालदार तुषार अशोक शेटे (नेमणूक- गुन्हे शाखा, युनिट-२, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून आरोपी समिर उस्मानी विरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम (Arms Act) १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार कडक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक (पोउनि) नाईकनिंबाळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.