डिजिटल मीडिया संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव

डिजिटल मीडिया संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव
बार्शी (प्रतिनिधी) ३ – अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘नारीशक्ती सन्मान सोहळा’ बार्शीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष राजा माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजेंद्र राऊत, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, तहसीलदार एफ. आर. शेख, नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले, पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गरड, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजय पाटील, महिला जिल्हाध्यक्ष निता देव, बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा महिलांचा सन्मान करण्यात आला. अनु प्रसाद मोहिते यांना ‘जीवन गौरव सन्मान’, शिवलीलाताई पाटील यांना ‘कीर्तन रत्न’, मनिषा लोकरे यांना ‘क्रीडा रत्न’, सायरा मुल्ला यांना ‘समाज रत्न’, सारीका संघवी यांना ‘मातृत्व गौरव’ तर मनिषा गुरव यांना ‘आदर्श महिला वाहक सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.

सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते माजी आमदार राजेंद्र राऊत यांची प्रकट मुलाखत. त्यांनी बार्शीच्या विकासकामांबाबत व आपल्या राजकीय प्रवासाबाबत सविस्तर भाष्य केले. त्यांच्या मुलाखतीची राज्यभर चर्चा रंगत आहे.संघटनेचे संस्थापक राजा माने यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत संघटनेने सात राज्यांमध्ये विस्तार केला असून डिजिटल माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे.
तसेच प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकार कुटुंबियांच्या आरोग्य व शिक्षणासाठी १७ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.सांस्कृतिक कार्यक्रमात वारकरी शिक्षण संस्थेतील ५० मुलींचा पाऊलखेळ, राऊत बंधूंचे सनई वादन आणि माऊली भिसे यांचे संबळ वादन यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.या सोहळ्यास तालुक्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या सर्व सदस्यांच्या अथक परिश्रमांमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.