मातंग समाजाच्या ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये कडक आंदोलन!

लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखालील एल्गार; मुख्यमंत्र्यांकडे तात्काळ अंमलबजावणीची मागणी
पिंपरी-चिंचवड: मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जातींमध्ये (SC) लोकसंख्येनुसार ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काल (दि. १३) पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. लोकसेवक युवराज दाखले यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी हिंदू मातंग एकता सेना आणि शिवशाही शासन पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
बीदर समिती’च्या अहवालानुसार तातडीने निर्णय घ्या
युवराज दाखलेआंदोलनाचे नेतृत्व करताना लोकसेवक युवराज दाखले आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. प्रशासनाला इशारा देताना ते म्हणाले:”मातंग समाजाच्या हक्कासाठी आणि उप-वर्गीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तालिके यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनीही महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व पोटजातींना न्याय मिळण्यासाठी उप-वर्गीकरण अत्यंत गरजेचे असल्याचा ऐतिहासिक निकाल दिला आहे. पंजाब, तमिळनाडू या राज्यांमध्ये याची अंमलबजावणी झाली आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठित केलेल्या ‘बीदर समिती’चा अहवाल सादर झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता अधिक वेळ न घालवता तात्काळ सकारात्मक आदेश काढावेत.”
आंदोलनातील ५ प्रमुख मागण्या:आंदोलनादरम्यान केवळ उप-वर्गीकरणच नव्हे, तर समाजाच्या अस्मितेशी आणि हक्कांशी जोडलेल्या खालील प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले:’अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरण: मातंग समाजाला न्याय देण्यासाठी लोकसंख्येनुसार वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी.’आर्टी’ (ARTI) मुख्य कार्यालय: २०१२ च्या महानगरपालिकेच्या ठरावानुसार, हाप्किन महामंडळाच्या पाच एकर जागेवर ‘आर्टी’चे मुख्य कार्यालय उभारण्यासाठी ती जागा तात्काळ हस्तांतरित करावी.महापुरुषांची अवमान करणाऱ्यांवर कारवाई: सोशल मीडियावर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत.स्मारक धमकी प्रकरणातील आरोपींना अटक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात धमकी देणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कठोर कारवाई व्हावी.अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा: पिंपरी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.
आंदोलनाची सुरुवात आणि प्रशासनाचे आश्वासनआंदोलनाची सुरुवात निगडी येथील मधुकर पवळे ब्रिज जवळील राजपूत गौरव महाराणा प्रताप आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला.
लोकसेवक युवराज दाखले यांनी स्वतः नायब तहसीलदारांना सर्व मागण्यांचे गांभीर्य सविस्तर समजावून सांगितले. आंदोलनकर्त्यांच्या भावनांची दखल घेत, “हे निवेदन तातडीने राज्य शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल,” असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. शासन आणि प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेवर आमचा विश्वास असून, निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.