अनाथ आश्रमास मदत……..

५ हजार वृक्षांचे वाटप अन् रक्तदान शिबिराने स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी

पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम; १३२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी (विशेष प्रतिनिधी) दि. २७ : पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार आणि लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘जनसेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ममता अंध-अनाथ आश्रमात धान्य व फळवाटप, ५ हजार वृक्षरोपांचे मोफत वाटप आणि १३२ जणांचे रक्तदान अशा विविध सामाजिक उपक्रमांनी स्व. दादांना आदरांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अरुण पवार, शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, माजी नगरसेवक राजू लोखंडे, शंतनू डोळस, अनुसूचित जमाती विभागाचे शहराध्यक्ष विष्णू शेळके, तृप्तीताई जवळकर, चैताली शालिंदर व गौरीताई गोंनटे यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते पार पडले.

सामाजिक उपक्रमांची रेलचेल अनाथ आश्रमास मदत: सप्ताहाच्या प्रारंभी पिंपळे गुरव येथील ‘ममता अंध-अनाथ आश्रम’ येथे आश्रमातील विद्यार्थ्यांना व गरजूंना अन्नधान्य आणि फळांच्या किटचे वाटप करण्यात आले.रक्तदान शिबीर: अरुण पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात १३२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.वृक्षवाटप: पिंपरी-चिंचवड शहर हरित बनवण्याच्या उद्देशाने ५ हजार वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. ही रोपे घेण्यासाठी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.प्रमुख वक्त्यांचे विचार आणि आदरांजली
”राष्ट्रवादी म्हणजे केवळ राजकारण नसून समाजकारण” – भाऊसाहेब भोईर “अजितदादांचा जीवनप्रवास हा पूर्णपणे जनसेवेने व्यापलेला होता. अनाथ आश्रमातील मुलांना मदत आणि ५ हजार झाडांचे वाटप करून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ही समाजकारणावर विश्वास ठेवणारी संघटना असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.”
”दादांची पोकळी भरून न निघणारी” – नाना काटे “अजितदादांनी नेहमीच शब्दांपेक्षा कामाला प्राधान्य दिले. शहराचा कायापालट करण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांची जयंती साजरी करताना अंतःकरण जड होत असून, त्यांची पोकळी कधीही भरून निघणार नाही.”

“आयटी हब अन् शेतीचा समतोल साधणारा नेता” – अरुण पवार
“पन्नास वर्षे राजकारणात राहूनही सर्वसामान्यांच्या शब्दाला किंमत देणारे दादा एकमेव नेते होते. त्यांनी शहरात एकीकडे आयटी हब वसवत असतानाच दुसरीकडे शेती आणि शेतकऱ्यांचाही तितकाच विचार केला. दादांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
”उत्तम प्रशासक हरपला” – तानाजी जवळकर “अजितदादा यांची जयंती साजरी करण्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला येईल असे वाटले नव्हते. ते महाराष्ट्राच्या प्रश्नांची खडान् खडा माहिती असलेले एक उत्तम प्रशासक होते.”
तसेच माजी नगरसेवक राजू लोखंडे आणि विष्णू शेळके यांनीही दादांच्या शिस्त, स्वच्छता आणि संकटसमयी पाठीशी उभे राहण्याच्या कार्यशैलीच्या आठवणींना उजाळा दिला.
मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, चंदाताई लोखंडे, कैलास थोपटे, सागर कोकणे, कॅप्टन युवराज माने, अतिश जवळकर, किशोर अट्टरगेकर, दीपक जाधव, दत्ता कदम, लहुजी पवार, नरेश पवार, साहिल रोकडे, बळीराम माळी, नितीन चौधरी, अनिकेत मुपीड, गणेश जवळकर, अनिता पांचाळ, आकाश कळसकर, दत्तात्रय धोंडगे, संतोष शिंदे, बाळासाहेब साळुंके, शिवाजी घोडके, सुग्रीव पाटील, लक्ष्मण जाधव यांच्यासह ‘विजयराज नागरी पतसंस्था’, ‘मराठवाडा जनविकास संघ’, ‘भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ’, ‘संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ’, ‘नवचैतन्य हास्य क्लब’ आणि ‘हास्ययोग परिवार’ संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते