‘शून्य कचरा शाळा’……..

उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होणार: महापौर रवि लांडगे
भोसरी (HR News मराठी ) दि २०.: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी येथील इंग्लिश मीडियम शाळेत ‘आसरा सोशल फाउंडेशन, पुणे’ यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या ‘शून्य कचरा शाळा’ प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे यांनी नुकतीच भेट दिली. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले.
या भेटीदरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर (Reuse), पुनर्निर्मिती (Recycle) आणि स्वच्छतेच्या सवयींबद्दल सविस्तर चर्चा केली. “शून्य कचऱ्याची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन :”स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. याची सुरुवात लहान वयात विद्यार्थ्यांपासून झाली, तर भविष्यात पर्यावरणाबाबत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडतील. शाळांमधील असे उपक्रम स्वच्छतेची सवय आणि कचरा व्यवस्थापनाची जाणीव अधिक दृढ करतात. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात आणि परिसरातही शून्य कचऱ्याचा संदेश पोहोचवावा.
“विद्यार्थ्यांचा पुढाकार आणि उपक्रमाची माहिती :या वेळी विद्यार्थ्यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती महापौरांना दिली. ओला व सुका कचरा वर्गीकरण आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे महापौरांनी विशेष कौतुक केले.
उपस्थित मान्यवर: या प्रसंगी आसरा सोशल फाउंडेशनच्या अर्चना मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता डिसुजा, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.