वर्षे सरली तरी मैत्रीची नाळ घट्ट!

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळा
पिंपरी प्रतिनिधी दि. ७: शाळा सुटली, वर्ग बदलले आणि प्रत्येक जण आपापल्या करिअर-संसारात रमला; मात्र शालेय आठवणी आणि जिवाभावाची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचा प्रत्यय रविवारी आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचालित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या २००३ (इंग्लिश मीडियम) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा ६ सप्टेंबर रोजी श्री कृष्ण पॅलेस हॉटेल येथे मोठ्या उत्साहात व भावुक वातावरणात पार पडला.
शिक्षकांच्या उपस्थितीने सोहळ्याला भावुक किनार विद्यार्थ्यांच्या एका आग्रहाखातर माजी शिक्षक ॲड. आशुतोष रानडे, रमेश गाढवे, अनिथा कदम (स्टीवन मिस), कविता गायकवाड आणि मुकेश पवार यांनी या मेळाव्याला आवर्जून हजेरी लावली. अनेक दशकांनंतर आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना समोर पाहून शिक्षकांचे डोळे पाणावले. शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला, तर विद्यार्थ्यांनी श्लोक म्हणत आपल्या गुरुजनांना मानवंदना देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
दिवंगतांना श्रद्धांजली आणि आठवणींचा कोलाज कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील दिवंगत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या वर्गमित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रंगलेल्या मनोरंजन सत्रात जुन्या खोड्या, गमतीजमती, संगीत आणि विविध खेळांच्या माध्यमातून सर्वांनी पुन्हा एकदा बालपण अनुभवले. एकत्र स्नेहभोजन घेत जुन्या मित्र-मैत्रिणींनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
आभार आणि यशस्वी आयोजन कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अमीन अझीझ व दिपाली दंदाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राजक्त घोरपडे यांनी केले. या अविस्मरणीय स्नेहसोहळ्याचे नेटके नियोजन प्राजक्त घोरपडे, विक्रांत वर्मा, अमीन अझीझ, दिपाली दंदाडे आणि गझलनाझ अल्फोन्स यांनी केले होते. उपस्थितांना आकर्षक भेटवस्तू देऊन आणि भविष्यातही हा स्नेहबंध असाच जपण्याचा संकल्प करत सोहळ्याची सांगता झाली.