पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळावर अण्णा बनसोडे यांची निवड सार्थ.

पिंपरीत उभारणार भव्य शैक्षणिक संकुल: रामदास आठवले
विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा पिंपरीत भव्य नागरी सत्कार संपन्न
पिंपरी (विशेष प्रतिनिधी) दि. ३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात भव्य शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार असून, राज्यात सर्वदूर शिक्षणाचे जाळे विस्तारून दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा आमचा संकल्प आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची झालेली निवड अत्यंत योग्य आणि सार्थ आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पिंपरी येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलास लांडे, भंते राहुल बोधी, सोसायटीचे विश्वस्त चंद्रशेखर कांबळे, नागसेन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर मंगलाताई कदम, संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर अमर मुलचंदाणी, परशुराम वाडेकर, सिद्धार्थ बनसोडे, नगरसेवक राहुल भोसले, प्रिया बनसोडे, सुनील मगरे यांच्यासह सत्कार समितीचे पदाधिकारी सुरेश निकाळजे, अंजना गायकवाड आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाचा विस्तार आवश्यक: रामदास आठवलेआपल्या भाषणात रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित, शोषित व दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. अण्णा बनसोडे हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले कणखर नेतृत्व आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही संस्था आणखी सक्षमपणे पुढे नेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही: मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचार आणि संविधानामुळेच आज आम्हा सर्वांना विधिमंडळात काम करण्याची आणि मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कार्याला सरकारतर्फे आवश्यक तो संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाईल. पदाचा वापर जनकल्याणासाठी करताना स्वाभिमान जपणे आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे पद सन्मानापेक्षा मोठी जबाबदारी: अण्णासाहेब बनसोडे सत्काराला उत्तर देताना उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे भावूक होत म्हणाले, “हा केवळ माझा वैयक्तिक सत्कार नसून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक व सामाजिक चळवळीचा वारसा सांभाळण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी किंवा नोकरीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव रुजवणे हा असला पाहिजे. बदलत्या काळानुसार पारंपरिक शिक्षणासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डिजिटल तंत्रज्ञान, कौशल्य आणि संशोधन यांवर भर देऊन संस्थेच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.”
कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर आणि विलास लांडे यांनीही मनोगत व्यक्त करत बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुरेश निकाळजे यांनी केले, सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, तर आभार अंजना गायकवाड यांनी मानले.