बार्शी डेपोचा भोंगळ कारभार!

लांब पल्ल्याच्या प्रवासाला ‘खटारा’ गाड्या; प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू?
बार्शी:लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाची सेवा ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, बार्शी डेपोच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे हीच जीवनवाहिनी आता प्रवाशांसाठी ‘दशक्रिया’ ठरू पाहत आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गांवर सातत्याने नादुरुस्त आणि भंगार अवस्थेतील गाड्या सोडून बार्शी डेपो प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा खळबळजनक आरोप आता थेट जनतेतून होत आहे.
रस्त्यातच गाड्या बंदप्रवासी वाऱ्यावर!
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी डेपोतून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर किंवा इतर दूरच्या शहरांकडे जाणाऱ्या अनेक बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक गाड्यांचे टायर गुळगुळीत झाले आहेत, तर काहींचे इंजिन कधीही दगा देईल अशा स्थितीत आहे. प्रवासादरम्यान भर हायवेवर किंवा निर्जन ठिकाणी या गाड्या अचानक बंद पडण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भर उन्हात किंवा रात्री-अपरात्री लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागत असून, त्यांच्या सुरक्षेची कोणतीही हमी डेपो प्रशासनाकडे नाही.
प्रशासनाला प्रवाशांच्या जीवाची किंमत नाही का?
लांब पल्ल्याचा प्रवास म्हणजे वेगवान आणि खडतर रस्ते. अशा मार्गांवर गाडी सुटण्यापूर्वी तिची पूर्ण तांत्रिक तपासणी करणे (Fitness Check) बंधनकारक असते. मग असे असतानाही नादुरुस्त गाड्या रस्त्यावर कशा धावतात?अनेकदा ब्रेक फेल होणे, इंजिनमधून धूर निघणे अशा जीवघेण्या घटना घडूनही प्रशासन ढिम्म का आहे?
एखादा मोठा अपघात घडल्यावरच बार्शी डेपोला जाग येणार का?
नागरिकांचा संतप्त सवाल:”आम्ही पैशांचे तिकीट काढून प्रवास करतो, मग आम्हाला मरणपंथाला लागलेल्या खटारा गाड्या का दिल्या जातात? बार्शी डेपोचे अधिकारी प्रवाशांच्या जिवाची किंमत शून्य समजतात का?”
प्रवाशांमध्ये तीव्र संताप
; आंदोलनाचा इशाराडेपोच्या या निष्काळजीपणामुळे बार्शीकरांमध्ये आता तीव्र असंतोष पसरला आहे. वेळेवर न पोहोचणे, प्रवासात नाहक त्रास होणे आणि जीवाला धोका निर्माण होणे यामुळे नागरिक आता आक्रमक झाले आहेत. बार्शी डेपोने त्वरित लांब पल्ल्याच्या मार्गांवर सुस्थितीतील आणि सुसज्ज गाड्या न सोडल्यास, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डेपो प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी आणि प्रवासी संघटनेने दिला आहे.आ
ता तरी वरिष्ठ प्रशासन या ‘खटारा’ कारभाराची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की प्रवाशांना देवाच्या हवाल्यावर सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.