भोसरी परिसरात चोरांचा सुळसुळाट!

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) दि. १७ :भोसरी येथील चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती आणि हनुमान कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट कमालीचा वाढला आहे. रात्रीच्या शांततेचा फायदा घेत चोरटे थेट घरांसमोर पार्क केलेल्या दुचाकींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री १ ते पहाटे ४ ची ‘डेडलाईन’!
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चोरटे मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत जास्त सक्रिय असतात. सामसूम झाल्यानंतर परिसरात दबा धरून बसलेले हे अज्ञात चोरटे दुचाकी वाहनांचे हँडल लॉक तोडून वाहने चोरण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना समोर आल्याने वाहनधारकांची झोप उडाली आहे.दोन संशयित सीसीटीव्हीत कैद? प्रत्यक्षदर्शींचा खळबळजनक दावापरिसरातील काही जागरूक नागरिकांनी रात्रीच्या वेळी दोन संशयित व्यक्तींना परिसरात घुटमळताना प्रत्यक्ष पाहिले आहे.
प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे: “रात्री उशिरा दोन संशयित तरुण परिसरात फिरताना दिसले. ते थांबलेल्या दुचाकींच्या जवळ जाऊन त्यांचे लॉक तपासत होते. आम्ही हटकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांनी तिथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.”
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
रात्रीची गस्त वाढवा: भोसरी पोलिसांनी चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती आणि हनुमान कॉलनी भागात रात्रीची पोलीस गस्त (Night Patrolling) त्वरित वाढवावी.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
परिसरातील खाजगी आणि सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संबंधित संशयित चोरट्यांचा माग काढावा आणि मुसक्या आवळाव्यात.
तातडीने कारवाईची अपेक्षा
चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, त्यामुळे पोलिसांनी यावर कडक पावले उचलावीत.परिसरात एखादी मोठी चोरी किंवा अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलीस प्रशासनाने या ‘रात्रीच्या भाईं’चा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी आता भोसरीकरांमधून होत आहे.