जिल्हा परिषद शाळा भोईजे येथे बाल आनंद दिन

भोईजेत ‘बाल आनंद बाजार’ उपक्रमाचे उत्साहात उद्घाटन, चिमुकल्यांच्या स्टॉल्सनी वेधले लक्ष
बार्शी प्रतिनिधी १० : धनंजय रामदासी चिमुकल्यांच्या बाजाराचा शुभारंभ, भोईंजेत बाल आनंद बाजाराचे उद्घाटनभोईजे येथील भोईजे माध्यमिकविद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोईजे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल आनंद बाजार’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमात दोन्ही शाळांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उभारलेल्या विविध स्टॉल्सनी ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. बाल आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी भाज्यांचे विविध स्टॉल्स, तसेच वडापाव, पाणीपुरी, पॅटिस, भेळ आदी खाद्यपदार्थांचे स्वच्छ, आकर्षक व नियोजनबद्ध स्टॉल्स उभारले होते. प्रत्येक स्टॉलमध्ये विद्यार्थ्यांची कल्पकता, व्यवहारकौशल्य, शिस्त व आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू व पदार्थांची विक्री करत व्यवहारज्ञानाचे प्रत्यक्ष धडे घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आर्थिक साक्षरता, संघभावना व उद्योजकतेची जाणीव निर्माण झाल्याचे चित्रपाहायला मिळाले. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्टॉल्सचे पालक, गावकरी व उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमास भोईंजे गावचे माजी सरपंच सुधीर निकम, उपसरपंच काशिनाथ आबा उमाटे, सुभाष नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसरपंच काशिनाथ आबा उमाटे यांनी आपल्या मनोगतात, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणासोबत जीवनोपयोगी कौशल्यांची जोड मिळणे ही काळाची गरज आहे,” असे नमूद केले.भोईजे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकवृंद जाधव सर, धिंदळे सर, राऊत सर, काशीद सर, राक्षे सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक हरिश्चंद्र गटकळ सर, दीपक डोईफोडे सर, चव्हाण सर, बरचे सर, सचिन देशमुख सर यांनी या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाल्याचे स्पष्ट झाले.या ‘बाल आनंद बाजार’ उपक्रमाने श्री दत्तात्रय महादेव गुरव (District Vice President Solapur, युवा ग्रामीण पत्रकार संघ भारत) हे विशेष प्रभावित झाले असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व शिक्षकांच्या परिश्रमांचे मनापासून कौतुक केले.कार्यक्रमास पालक, गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा, विद्यार्थी व ग्रामसमाज यांचा सुंदर समन्वय साधणारा ‘बाल आनंद बाजार’ उपक्रम भोईजेसाठी एक आदर्श ठरला असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.