मोशी दुर्घटना : दोषींना निलंबित करा
मृतांच्या वारसांना ५० लाखांसाठी पाठपुरावा; मनपा सभेत महापौरांचे कडक निर्देश!
पिंपरी प्रतिनिधी दि. १५ :मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेचे पडसाद आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभेत तीव्रतेने उमटले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने दोषींवर तात्काळ कडक कारवाईचा बडगा उगारला असून, पीडित कुटुंबांना मोठा दिलासा देणारे ठोस निर्णय जाहीर केले आहेत. “या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होणारच,” असा सज्जड दम महापौर रवि लांडगे यांनी भरला आहे.
सभेत घेण्यात आलेले मुख्य आणि कडक निर्णय खालीलप्रमाणे:
१. दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन दुर्घटनेत प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी ठेवल्याप्रकरणी मनपाने कडक पाऊल उचलले आहे. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, संबंधित ठेकेदार कंपनी ‘अँटोनी लारा’चे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
२. पीडित कुटुंबांना भक्कम आर्थिक व सामाजिक आधारमनपातर्फे मदत:
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची आर्थिक मदत मनपाकडून दिली जाईल.ठेकेदाराकडून ५० लाखांची मागणी: ठेकेदार मे. अँटोनी लारा कंपनीकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन कडक पाठपुरावा करणार आहे.भविष्याची जबाबदारी: मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च महानगरपालिका उचलणार आहे. तसेच, कुटुंबातील पात्र वारसाला मनपा सेवेत नोकरी मिळवून देण्यासाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
३. कचरा व्यवस्थापनात मोठे बदल
शहरातील कचऱ्याची कोंडी फोडण्यासाठी आणि अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण केले जाणार आहे. यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार, शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे कडक निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
“दुर्घटनेत जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबांची जबाबदारी केवळ आर्थिक मदत देऊन संपत नाही. त्यांच्या मुलांचे भविष्य आणि वारसांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारकडे पूर्ण ताकदीने पाठपुरावा करू. चौकशी निष्पक्ष होईल आणि दोषींना त्यांची जागा दाखवली जाईल.” — रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड