Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिका संचलित दिव्यांग भवन फाउंडेशनला महापौर रवि लांडगे यांची भेट

पिंपरी प्रतिनिधी , दि. १६ मार्च २०२६ : दिव्यांग नागरिकांचे सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. दिव्यांग नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सक्षम आणि स्वावलंबी व्हावे यासाठी विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत. अशा संस्थांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांना दर्जेदार आरोग्य सेवा, पुनर्वसन सुविधा तसेच आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग नागरिकांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दिव्यांग भवन फाउंडेशन संस्थेला महापौर रवि लांडगे यांनी भेट देत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा, उपचार पद्धती तसेच पुनर्वसन उपक्रमांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

याप्रसंगी दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, पूजा भापकर तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महापौर रवि लांडगे यांनी दिव्यांग भवन फाउंडेशनच्या परिसराला भेट देऊन उपचार कक्ष, प्रशिक्षण विभाग तसेच दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सुविधांची पाहणी केली. यामध्ये फिजिओथेरपी, समुपदेशन सेवा, विशेष प्रशिक्षण तसेच पुनर्वसनाशी संबंधित विविध उपचार पद्धतींबाबत त्यांनी माहिती घेतली.दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा अधिक प्रभावी, सुलभ आणि दर्जेदार पद्धतीने विस्तार व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच दिव्यांग नागरिकांना या सुविधांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सेवा विस्तारावर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button