‘तर तुमचाही किशोर आवारे करू’, अशी धमकी देत गाववाल्यांची सोसायटीधारकांना लोखंडी रॉडने मारहाण

सातजणांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी प्रतिनिधी १८: “आम्ही गाववाले आहोत, इमारत उभी राहिली, तेव्हापासून आमचेच कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही आमचे कॉन्ट्रॅक्ट बदलण्याची हिंमत करु नका”, अशी धमकी देत गावगुंडांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या मिटिंगमध्ये घुसून महिला सभासद, सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांना लोखंडी रॉड व हाताने मारहाण केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. दरम्यान, “जशी किशोर आवारे यांची हत्या केली, तशी तुम्हा तिघांची विकेट पाडू,” अशी जीवे मारण्याची धमकीही या गुंडांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी. या आरोपिंना राजकीय वरदहस्त असल्यामुळेच आमच्यावर हल्ला करण्याइतपत त्यांची मजल गेली. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी फिर्यादी रेखा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली.
याबाबत रेखा प्रदीप वाघ (रा. ए विंग, मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विराज खळदे (वय अंदाजे 35 वर्षें), भावेश खळदे (वय अंदाजे 32 वर्षें), महेश खळदे (वय अंदाजे 55 वर्षें), भूषण खळदे (वय अंदाजे 36 वर्षें), सौरभ उर्फ शुभम खळदे (वय अंदाजे 28 वर्षें), चिराग खळदे (वय अंदाजे 33 वर्षें) सर्वजण राहणार खळदे आळी, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे), मतिन (वय अंदाजे 40 वर्षे) अध्यक्ष ए विंग, राहणार मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, मंत्रा सिटी ए विंग सोसायटीमधील सर्व पदाधिकारी सदस्यांची १५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिटिंग सुरू होती. या मीटिंगला सोसायटीचे अध्यक्ष शांताराम रामभाऊ कोकाटे, सचिव हेमंत मधुकर संपकाळ, फिर्यादी रेखा वाघ उपस्थित होते. यावेळी मिटींगमध्ये रेखा वाघ या त्यांनी तयार केलेल्या दोन वर्षाच्या लेजरबाबत सांगत होत्या. तसेच मी वेन्डर बदलण्याविषयी मत मांडत होत्या. परंतु मिटींगमधील इतर लोक त्यांना त्यांचे म्हणणे मांडू देत नव्हते. यावेळी आरोपी विराज खळदे आणि आणि आरोपी महेश खळदे यांनी दमदाटी करीत “आम्ही गाववाले आहोत, इमारत उभी राहिली, तेव्हापासून आमचेच कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही आमचे कॉन्ट्रॅक्ट बदलण्याची हिंमत करु नका”. सचिव हेमंत सपकाळ हे आरोपी खळदे यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. त्याचवेळी आरोपी भावेश खळदे, विराज खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, चिराग खळदे, भूषण खळदे, महेश खळदे, मतिन यांनी अचानक हेमंत सपकाळ यांच्या पाठीमागून येऊन त्यांना लोखंडी रॉड व हाताने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादी रेखा वाघ आणि शांताराम रामभाऊ कोकाटे हे हेमंत सपकाळ यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना त्या सर्वानी मिळून तिघांनाही खुर्च्या उचलून आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी रेखा वाघ व सोसायटीचे अध्यक्ष रामभाऊ कोकाटे, सचिव हेमंत सपकाळ तिघेही त्या मिटींगमधून बाहेर पडत होते. यावेळी आरोपी विराज खळदे आणि भावेश खळदे यांनी धमकी दिली, की “जशी किशोर आवारे यांची हत्या केली, तशी तुम्हा तिघाची विकेट पाडू.”
तिघे जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यास सांगितले. उपचार घेऊन फिर्यादी रेखा वाघ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या असता सोबत त्यांची मुलगीही होती. त्यावेळी त्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्ती देखील तिथे आल्या. फिर्यादी तक्रार देत असताना आरोपी विराज खळदे रेखा वाघ आणि त्यांच्या मुलीकडे रागाने, खुनसी नजरेने पाहत होता. त्याचप्रमाणे लांबून अश्लिल चाळेही करीत होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने फिर्यादीच्या मुलीने तिच्याकडे असलेली बॅग फेकुन मारली. त्याचवेळी विराज खळदे याने दोघींनाही पोलिसांसमोरच मारहाण केली.
आरोपींचे वर्तन पाहता आमच्या जीविताला त्यांच्याकडून धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना पाठीशी न घालता कठोर शिक्षा देऊन अटक करण्यात यावी. तसेच आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे. अन्यथा आम्ही राज्य महिला आयोग आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे फिर्यादी रेखा वाघ यांनी सांगितले.