Uncategorized

फायनान्सच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी गजाआड

बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई, २ आरोपी तात्काळ जेरबंद!

​गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आवळल्या आवळल्या मुसक्या

​वसुली एजंट बनून सर्वसामान्यांना लुटणाऱ्यांचे धाबे दणाणले​

बार्शी तालुका पोलिसांचे नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन

​बार्शी (प्रतिनिधी) दि. १५ : श्रीराम फायनान्स व इतर नामांकित फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट असल्याचे भासवून, गाडीवर कर्ज असल्याचे सांगत सर्वसामान्य वाहनधारकांना गाठून बेकायदेशीरपणे पैसे उकळणाऱ्या आणि लुटमार करणाऱ्या एका टोळीचा बार्शी तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन सराईत आरोपींना तात्काळ अटक केली आहे.​

पेट्रोल पंपाजवळ गाठून केली लूटमार​

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १४ जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास सतीश विजयराव हावळे (रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) हे त्यांच्या मुलाच्या नावावर असलेली हिरो पॅशन मोटरसायकल (क्रमांक MH 25 BC 3883) घेऊन बार्शीकडे औषधे व इतर महत्त्वाच्या कामासाठी येत होते. कुसळंब टोलनाक्याच्या पुढे एम.पी. पेट्रोल पंपाजवळ आले असता, पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना रस्त्यात आडवले.​

“तुझ्या गाडीवर फायनान्सचे कर्ज आहे, आम्ही गाडी जप्त करणार,” असे धमकावून त्यांनी जबरदस्तीने गाडीची चावी काढून घेतली. फिर्यादीने विनंती केली असता, आरोपींनी १२ हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी केली. घाबरलेल्या फिर्यादीने १० हजार रुपये फोन पे आणि रोख स्वरूपात दिले. एवढ्यावरच न थांबता, चावी परत करताना आरोपींनी फिर्यादीच्या बोटातील १ लाख रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.​

पोलिसांनी तात्काळ आवळल्या मुसक्या

​या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादीने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आज (दि. १५) गुन्हा रजिस्टर नंबर १८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२७(७), ३०८(२), ३०९(४), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला.​घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) महेश माने व त्यांच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले.​

अटकेतील आरोपींची नावे:

१) अनिकेत सुनील रसाळ (वय २६ वर्षे, रा. तुळजापूर रोड, मांगडे चाळ, बार्शी)

२) ओंकार दीपक परदेशी (वय २८ वर्षे, रा. भवानी पेठ, बार्शी)

​हे आरोपी फायनान्स कंपनीचे बोगस वसुली एजंट बनून अवैध रित्या लोकांना त्रास द्यायचे व पैसे उकळायचे, असे तपासात समोर आले आहे.​

पोलीस प्रशासनाचे नागरिकांना जाहीर आवाहन!​

“फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली जर कोणाची अशा प्रकारे फसवणूक किंवा लूटमार झाली असेल, अथवा कोणत्याही बोगस एजंटने त्रास दिला असल्यास, नागरिकांनी न घाबरता विनाविलंब बार्शी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.”— महेश माने (प्रभारी अधिकारी, सपोनि, बार्शी तालुका पोलीस ठाणे)​

कामगिरी करणारे पोलीस पथक:​

सदरची धडक कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. नि. महेश माने, पोसई भालेराव, सपोफौ गवळी, पोहेकों उंदरे, खांडेकर, बोबडे, घाडगे, देशमुख, कावळे, पोकों बचुटे, दासरे, लोंढे आणि चापोकों चिट्टलवाड यांनी अत्यंत चोखपणे बजावली आहे. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे बार्शी तालुक्यात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button