पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांची पत्रकार परिषद
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी दि. १५ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांना पारदर्शकपणे पाहता यावे, यासाठी सभेचे लाईव्ह प्रक्षेपण तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महापालिकेतील निर्णयप्रक्रिया नागरिकांसमोर खुली राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. सभागृहातील चर्चा, विकासकामांवरील निर्णय आणि लोकप्रतिनिधींची भूमिका नागरिकांना थेट पाहता यावी, यासाठी डिजिटल माध्यमातून लाईव्ह प्रसारण सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यामुळे महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल, नागरिकांचा सहभाग वाढेल आणि प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.