Uncategorized

रावेतमधील Arise International School विरुद्ध पालकांच्या लुटीचा आरोप; यू-डायस क्रमांक गोठवण्याची मागणी, शाळा बंद होण्याच्या मार्गावर

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी १६

पिंपरी चिंचवडमधील रावेत येथे असलेल्या Arise International School या खाजगी शाळेविरुद्ध फी वाढ व पुस्तक-गणवेश खरेदीची सक्ती केल्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यामुळे शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत या शाळेविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून वारंवार नोटिसा देण्यात आल्या.

तसेच 3 जुलै 2025 रोजी सुनावणी घेऊन शाळेला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.सुनावणीदरम्यान शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांकडून गणवेश, शूज व पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करू नये, दरवर्षी पुस्तकांची प्रकाशने बदलू नयेत, ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’च्या नावाखाली घेतलेली फी पालकांना परत करावी तसेच फी वाढीबाबत संपूर्ण तपशील कार्यालयास सादर करावा, असे आदेश देण्यात आले होते.मात्र शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन शाळेकडून आजपर्यंत करण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे.

उलट शाळेने शिक्षक-पालक संघाची मान्यता न घेता सन 2023-24, 2024-25 व 2025-26 या सलग तीन शैक्षणिक वर्षांत फी वाढ केल्याचे सादर केलेल्या तक्त्यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे उघड उल्लंघन झाल्याचा ठपका शाळेवर ठेवण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणात कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी जाणूनबुजून दिरंगाई केल्याचा आरोपही होत आहे. वारंवार तक्रारी, नोटिसा आणि सुनावणी होऊनही शाळेविरुद्ध ठोस कारवाई न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हित धोक्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित शाळेचा यू-डायस क्रमांक गोठविण्याची मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी संगीता बांगर यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीवर निर्णय झाल्यास संबंधित शाळेवर कठोर कारवाई होण्याची शक्यता असून शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button