सराईत मोटारसायकल चोर जेरबंद; २१.६६ लाखांच्या ४० दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३४ गुन्ह्यांचा उलगडा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी , दि. १२ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून २१ लाख ६६ हजार रुपये किंमतीच्या ४० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाहन चोरीचे एकूण ३४ गुन्हे उघडकीस आले आहेत.पिंपरी चिंचवड परिसरात मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व गुन्हे शाखांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.दरम्यान, २ मार्च २०२६ रोजी बावधन पोलीस ठाणे हद्दीत नांदे गावातून स्प्लेंडर मोटारसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-२ कडे वर्ग करण्यात आला.गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीने वापरलेल्या मार्गावरील ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आश्पाक ईसाक पठाण (वय ३२, रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला ७ मार्च २०२६ रोजी बालेवाडी परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.तपासादरम्यान आरोपीने अनेक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २१,६६,००० रुपये किंमतीच्या ४० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून पुणे जिल्ह्यातील ३४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.तसेच आरोपी चोरीच्या मोटारसायकली मुकुंद उद्धवराव हारदास (वय २५, रा. पाटोदा (मावा), ता. परतुर, जि. जालना) याला विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपी लोकांना या मोटारसायकली फायनान्स कंपनीकडून हप्ते थकल्याने जप्त केलेल्या गाड्या असल्याचे सांगून विक्री करत होता.तपासात असेही उघड झाले की आरोपीला स्प्लेंडर मोटारसायकलची विशेष आवड होती.

सुरुवातीला त्याने एक स्प्लेंडर चोरी केली आणि त्यानंतर त्याला मोटारसायकल चोरीची सवय लागली. मागील दोन-तीन वर्षांपासून तो पाथर्डीहून बसने पुण्यात येऊन मोटारसायकली चोरी करत असल्याचे समोर आले आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही वाहन चोरीचे १० गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व त्यांच्या पथकाने केली.