चाकणमध्ये जीवाची पर्वा न करता गॅसची काळी बाजारी; कमर्शियलमधून घरगुती सिलिंडरमध्ये रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
चाकण (खेड) प्रतिनिधी दि. ९:सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत, अत्यंत धोकादायक पद्धतीने व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरमधून घरगुती गॅस सिलिंडरमध्ये गॅसची बेकायदेशीर रिफिलिंग करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटवर चाकण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
कोणतीही सुरक्षितता न बाळगता थेट रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या या जीवघेण्या प्रकाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, चाकण पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्याच्या कडेलाच सुरू होता मृत्यूचा खेळ!
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०९/०६/२०२६ रोजी संध्याकाळी १८:४५ वाजण्याच्या सुमारास चाकण गावच्या हद्दीत चक्रेश्वर मंदिर ते मेदणकरवाडी फाटा जाणाऱ्या रोडवर, त्रिशुळ चौकाच्या पुढे ‘कल्पहोम द्वारका माई सोसायटी’ समोर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी निखिल अनिल झोडापे (वय २२ वर्षे, रा. कुर्ळी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. जुना उमरसरा, यवतमाळ) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे गॅसची चोरी करत होता.लोकांच्या जिवाला धोका निर्माण करून काळीबाजारीआरोपीने व्यावसायिक वापराच्या गॅसच्या टाकीमधून लाल रंगाच्या लहान टाकीमध्ये काळ्या रंगाचे नोझल पाईप लावून कोणतीही सुरक्षा नसताना गॅस भरण्याचा सपाटा लावला होता.
हा प्रकार अत्यंत स्फोटक आणि आजूबाजूच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणारा होता. स्वतःच्या फायद्यासाठी तो हा गॅस चढ्या भावाने विकत होता. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भैरबा मनोहर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक (मपोउनि) कदम या प्रकरणाचा पुढील कडक तपास करत आहेत.
दाखल कलमे:
चाकण पोलीस ठाण्यात गु.र.नं ५०५/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३०३(२), ३१८(३), १२५, २८७ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह (पुरवठा व वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे कडक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.