व्यसनाच्या अंधाराकडून प्रकाशाकडे!

भोसरीत ‘गाव तिथे व्यसनमुक्ती’ अभियानाचा कडक एल्गार!
‘होप व्यसनमुक्ती केंद्रा’च्या पहिल्या शाखेचे थाटात उद्घाटन; आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी सप्ताहाचा भोसरीत शानदार समारोप!
भोसरी (विशेष प्रतिनिधी): तरुणाईला ग्रासणाऱ्या व्यसनाधीनतेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी आणि ग्रामीण भागात व्यसनमुक्तीची मोठी चळवळ उभी करण्यासाठी भोसरीमध्ये एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) आणि होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र (भोसरी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गाव तिथे व्यसनमुक्ती’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा अत्यंत उत्साहात प्रारंभ करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी सप्ताहाच्या सांगतेनिमित्त ‘होप’च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन आणि भव्य बोर्ड अनावरण समारंभ नुकताच पार पडला.
दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आणि उद्घाटनाचा थाट
दि. १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत राज्यभरात राबवण्यात आलेल्या जनजागृती सप्ताहाचा समारोप या कार्यक्रमाने झाला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विजय मोरे व प्रा. सुनिता मोरे यांनी केले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रविभाऊ लांडगे यांच्या शुभहस्ते या केंद्राचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी समाज कल्याण आयुक्तालयाच्या (पुणे) सहाय्यक आयुक्त (व्यसनमुक्ती कार्य) मा. श्रीमती मीना आंबाडेकर, पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा. श्री. राधाकिसन देवढे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. सुरेशभाऊ लांडगे आणि समाजकल्याण निरीक्षक मा. श्री. रोहन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वच मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, ‘होप’ केंद्र भविष्यात शेकडो कुटुंबांचे संसार वाचवेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
“कुटुंब आणि युवकांचा सहभागच व्यसनमुक्तीची ताकद!” — प्रा. दिगंबर ढोकले
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले प्रा. दिगंबर ढोकले यांनी आपल्या रोखठोक आणि प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले,”व्यसनमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर केवळ भाषणे देऊन चालणार नाही, तर प्रत्येक घरात जनजागृती झाली पाहिजे. यात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते, तेव्हा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. म्हणूनच, कुटुंबाचा पाठिंबा आणि योग्य समुपदेशन हीच व्यसनमुक्तीची खरी ताकद आहे.”
‘या’ ठिकाणी सुरू झाले केंद्र!
हा संपूर्ण सोहळा पुणे-नाशिक हायवे, महाराष्ट्र हॉटेल शेजारी, चक्रपाणी वसाहत, भोसरी (पुणे) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भोसरी व परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, महिला, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”गाव तिथे व्यसनमुक्ती” हा केवळ एक सरकारी उपक्रम न राहता, ती एक लोकचळवळ बनावी आणि महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा व्यसनमुक्त व्हावा, असा संकल्प याप्रसंगी सोडण्यात आला. ‘होप’ केंद्राच्या या पहिल्या शाखेमुळे आता गरजू रुग्णांना योग्य मानसिक उपचार आणि पुनर्वसनाची हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.