संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज!

’वारकऱ्यांची गैरसोय खपवून घेणार नाही’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रशासनाला कडक निर्देश
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी , २ जुलै २०२६:जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पालखी मार्गाची आणि विसावा ठिकाणांची जय्यत तयारी सुरू केली आहे. वारकरी आणि भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज प्रत्यक्ष जमिनीवर उतरून संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली. “पालखी सोहळा हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दम आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागांना दिला.
या दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्यासह महापालिकेचे सर्व विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भक्ती-शक्ती चौकातून मोहिमेला सुरुवात; ‘मेट्रो’च्या अडथळ्यांवर कडक कारवाई
सकाळी भक्ती-शक्ती चौकातून आयुक्तांच्या या विशेष पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली.
मेट्रो कामाचे अडथळे: मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे पालखी सोहळ्याला आणि भाविकांना अडचण येणार नाही, याची खातरजमा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच रस्त्यावरील अनावश्यक बॅरिकेड्स त्वरित हटवण्याच्या सूचना केल्या.अतिक्रमणावर हातोडा: मार्गावरील अनधिकृत टपऱ्या आणि रस्त्यांवर येणाऱ्या लहान व्यावसायिकांमुळे भाविकांच्या वाटेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कडक पावले उचलण्याचे आदेश त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले.पावसाळा आणि चिखलाचे आव्हान; ‘ॲक्शन प्लॅन’ तयारविठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिर परिसर आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील पालखी तळ, दर्शन रांग आणि मंडप व्यवस्थेचा आयुक्तांनी बारीक आढावा घेतला.”पावसाळ्याचे दिवस असल्याने पालखी तळाच्या मैदानावर चिखल होणार नाही, याची दक्षता घ्या. मैदानावर तात्काळ खडी आणि मुरूम टाकून जागा सपाट करा. तसेच शुद्ध पाणीपुरवठा, चोख प्रकाश व्यवस्था आणि २४ तास वैद्यकीय सुविधा तैनात ठेवा.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पंचमक
झाडांच्या फांद्या छाटण्यापासून ते रस्ते दुरुस्तीपर्यंत सर्व कामे तातडीने पूर्ण करा!
आकुर्डीतील खंडोबा चौकातील पाहणी दरम्यान, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि पालखी रथाला अडथळा ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर आयुक्तांनी दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाचीही पाहणी केली. येथील एकूण तयारीवर आयुक्तांनी समाधान व्यक्त केले, मात्र शेवटच्या टप्प्यातील आवश्यक सुधारणा वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
महापालिकेचा मुख्य फोकस:आरोग्य व स्वच्छता: पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय आणि सॅनिटायझेशनची चोख व्यवस्था.सुरक्षा व्यवस्था: गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी हाय-टेक सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा.तात्काळ रस्ते दुरुस्ती: पालखी मार्गावरील खड्डे युद्धपातळीवर बुजवून रस्ते चकाचक करणे.पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने यावर्षी पालखी सोहळा अधिक शिस्तबद्ध, देखणा आणि सुरक्षित करण्यासाठी कंबर कसली असून, संपूर्ण यंत्रणा हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे.