संत मुक्ताबाई पालखीचे बार्शी तालुक्यात उत्साहात स्वागताची तयारी

३१८ वर्षांची अखंड सेवा कायम, भाविकांमध्ये मोठा उत्साह
HRNews वृत्तसेवा (बार्शी) दि. १८ : आदिशक्ती संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताबाई संस्थान, कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथून निघालेल्या या पालखी सोहळ्याचे रविवारी बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे आगमन होणार आहे. या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.
प्रशासनातर्फे स्वागताची तयारी; ३१८ वर्षांची परंपरा कोरोनाचे दोन वर्षे वगळता गेल्या ३१८ वर्षांपासून ही वारी अखंडपणे सुरू आहे. पालखीच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर रांगोळी काढून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्याची परंपरा आहे. शेंद्री गावातील हनुमान मंदिर परिसर, पालखी मुक्कामाची जागा, शाळा आणि मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली असून, पालखीच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या फुलांची सजावट, फटाक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
कोथळी ते पंढरपूर ७५० किलोमीटरचा पायी प्रवास श्री संत मुक्ताबाई यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे हे ३१८ वे वर्ष आहे. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर अशा सहा जिल्ह्यांतील १७ तालुक्यांमधून मार्गक्रमण करत ही पालखी सुमारे ७५० किलोमीटरचा पायी प्रवास करते. या सोहळ्यात मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच मध्य प्रदेशातील हजारो भाविक सहभागी होतात.
या वारीची मुख्य वैशिष्ट्ये : ३०० वर्षांपासून प्रत्येक कुटुंबात वारकऱ्यांच्या सेवेची जबाबदारी: शेंद्री गावातील सर्वात मोठी आणि अनोखी परंपरा म्हणजे पालखीसोबत पायी येणाऱ्या सुमारे अडीच हजार वारकऱ्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था गावातील प्रत्येक कुटुंब आपल्या क्षमतेनुसार करते. गेल्या ३०० वर्षांपासून ही सेवा अखंडपणे सुरू आहे.’सोन्या-मोन्या’ बैलजोडी मुख्य आकर्षण: चांदीच्या भव्य रथाला ओढण्यासाठी ‘सोन्या-मोन्या’ या मानाच्या बैलजोडीला सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले असून, हे या वारीचे मुख्य आकर्षण ठरत आहे.प्रशासकीय सुविधा: पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाबत्ती, आरोग्य सेवा, औषधोपचार आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे, अशी माहिती शेंद्री ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच महादेव चव्हाण यांनी दिली.
पालखी प्रस्थान आणि मुक्काम: २४ जून रोजी मुक्ताईनगर येथून प्रस्थान झालेली ही पालखी २० जुलै रोजी माढा आणि २२ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे आणि मुक्ताई मठाचे सुधाकर पाटील यांनी दिली.