अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टिना शर्मा घेवारे यांना ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर.

पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने निळू फुले नाट्यगृहात उद्या होणार सन्मान.
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) दि. ३ :“बोल मै हलगी बजाऊ क्या” फेम प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या टिना शर्मा घेवारे यांना प्रतिष्ठेचा ‘कलागौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वतीने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी निळू फुले नाट्यगृह, नवी सांगवी येथे आयोजित विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या मंचावरून आपल्या कलाप्रवासाची सुरुवात करणाऱ्या टिना शर्मा घेवारे यांनी कलाक्षेत्रासह सामाजिक कार्यातही ठसा उमटवला आहे. डीजे शो आणि अश्लील कार्यक्रमांविरोधात राबवलेली व्यापक मोहीम, कलाकारांच्या विविध हक्कांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कलाक्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान या पार्श्वभूमीवर त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
“जन्मभूमीत होणारा सन्मान हा भावनिक क्षण”
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भावना व्यक्त करताना टिना शर्मा घेवारे म्हणाल्या, “माझ्या कलेची सुरुवात पिंपरी-चिंचवडच्या याच मातीतून आणि रामकृष्ण मोरे नाट्यगृहातून झाली. त्यामुळे जन्मभूमीत मिळणारा हा सन्मान अत्यंत अभिमानास्पद आणि भावनिक आहे. या शहराने मला कलाकार म्हणून ओळख दिली असून, कलेचे आणि शहराचे ऋण फेडण्यासाठी कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.”
कलाकारांच्या प्रश्नांवर नेहमीच पाठबळ देणारे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बनसोडे यांच्या मार्गदर्शनामुळे कलाकारांचे प्रश्न सोडवण्यास मोठी ताकद मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
हा सन्मान म्हणजे केवळ कौतुक नसून कलाकारांना न्याय मिळवून देणे आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याची नवी जबाबदारी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पुरस्काराबद्दल त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड कलाकार संघ, सहकारी कलाकार आणि रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.