राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन.

•गांधीजींचे तत्त्वज्ञान आचरणात आणणे हीच खरी आदरांजली
• शहराध्यक्ष योगेश बहलदोन्ही महापुरुषांचा वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवा
•विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरदिवेआगर दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पिंपरी, दि. २ ऑक्टोबर (प्रतिनिधी):सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती तसेच साधेपणा, प्रामाणिकपणा आणि पराक्रमाचे मूर्तिमंत रूप असलेले भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची १२२ वी जयंती पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खराळवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, “सत्य, अहिंसा, साधेपणा, स्वच्छता आणि सर्वधर्मसमभाव ही गांधीजींच्या विचारांची मूलभूत तत्त्वे आहेत. आजच्या काळात प्रत्येकाने सत्याचा मार्ग स्वीकारून सामाजिक सलोखा राखला पाहिजे. गांधीजींचे विचार केवळ भाषणांपुरते किंवा जयंतीपुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
लाल बहादूर शास्त्रीजींच्या स्मृतींना उजाळा देताना बहल म्हणाले, “शास्त्रीजींचे जीवन हे साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थ देशसेवेचा वस्तुपाठ आहे. त्यांनी दिलेली ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा देशाची सुरक्षा आणि अन्नसुरक्षा या दोन्ही आघाड्यांवर आजही मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान दिले पाहिजे.”

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी मनोगतात सांगितले, “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत गांधीजी व शास्त्रीजींचे योगदान अनन्यसाधारण आहे. सत्य, अहिंसा, साधेपणा आणि देशसेवेची त्यांनी दिलेली शिकवण समाजासाठी पथदर्शक असून, त्यांचा हा वैचारिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.”
दिवेआगर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांना श्रद्धांजलीकार्यक्रमादरम्यान दिवेआगर येथे समुद्रात बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त केल्या.
या प्रसंगी माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, कार्याध्यक्ष फझल शेख, नगरसेवक शेखर चिंचवडे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, भोसरी विधानसभा समन्वयक प्रकाश सोमवंशी, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओवाळ, सेवादल अध्यक्ष माऊली मोरे, आदिवासी सेल अध्यक्ष विष्णू शेळके, उपाध्यक्ष अकबर मुल्ला, संपत पाचुंदकर, बाळासाहेब पिल्लेवार, सरचिटणीस राजेंद्र पवार, रमजान सय्यद, सेवादल भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रवीण पिंजन, प्रदीप गायकवाड, मनीष शेंडगे, राजू लोणके, धनाजी तांबे, सुनील अडागळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.