Uncategorized

भोईजे येथील तुटलेल्या पुलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तात्काळ दुरुस्तीची मागणी

पोलीस पाटील ललिता मुसळे यांचे प्रशासनाला निवेदन; अपघाताचा धोका वाढला

| प्रतिनिधी | बार्शी |१७मौजे भोईजे ते श्रीपत पिंपरी या सार्वजनिक रस्त्यावर असलेला पूल पूर्णतः तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरून दररोज नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी बस तसेच आपत्कालीन सेवा यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.पूल कोसळल्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत मौजे भोईजे येथील पोलीस पाटील ललिता बाळू मुसळे यांनी प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

सदर प्रकरणात संबंधित विभागाकडून वेळेवर देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार भारतीय दंड संहिता (IPC) मधील विविध कलमांअंतर्गत गंभीर मानला जाऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मुसळे यांनी प्रशासनाकडे तुटलेल्या पुलाची तात्काळ पाहणी करून दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ बॅरिकेडिंग, इशारा फलक आणि पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.

यासोबतच पूल कोसळण्यामागील कारणांची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी, अभियंते किंवा कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व पुलांची सुरक्षा तपासणी (सेफ्टी ऑडिट) करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button