कौतुकास्पद! मोशीत सुरक्षारक्षकाचा अनोखा प्रामाणिकपणा.

पैशांनी गच्च भरलेले पाकीट मूळ मालकाला केले परत
निसर्ग राघवेंद्र सोसायटीत कृष्णकांत दातार यांच्या कर्तव्यनिष्ठेला रहिवाशांचा सलाम!
मोशी (विशेष प्रतिनिधी) दि. ५: पैशांच्या मोहात भल्याभल्यांची नियत फिरते, अशा काळात मोशीतील एका सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या उत्तुंग प्रामाणिकपणामुळे माणुसकीचे दर्शन घडले आहे. निसर्ग राघवेंद्र सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सापडलेले पैशांनी भरलेले पाकीट कोणताही लोभ न धरता मूळ मालकाचा शोध घेऊन सुखरूप परत करत सुरक्षारक्षक कृष्णकांत दातार यांनी समाजात प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून दिला आहे.
नेमकी घटना काय?
डीडी मॅनपावर सर्व्हिसेसचे सुरक्षा कर्मचारी कृष्णकांत दातार हे निसर्ग राघवेंद्र सोसायटीच्या मेन गेटवर कर्तव्यावर तैनात होते. ड्युटीदरम्यान त्यांना परिसरात एक पाकीट पडलेले आढळले. त्यांनी ते उचलून तपासले असता त्यात रोख रक्कम असल्याचे लक्षात आले. मात्र, कष्टाच्या कमाईवर विश्वास ठेवणाऱ्या दातार यांनी क्षणाचाही विलंब न लावता आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता थेट पाकिटाच्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
जसेच्या तसे पाकीट सुपूर्द
सोसायटी परिसरामध्ये चौकशी करून त्यांनी मूळ मालकाशी संपर्क साधला आणि पैशांनी भरलेले ते पाकीट जसेच्या तसे संबंधितांच्या स्वाधीन केले. पाकीट परत मिळाल्यानंतर मालकाच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले.दातार यांच्या या निस्वार्थी कृतीचे निसर्ग राघवेंद्र सोसायटीतील रहिवाशांनी भरभरून कौतुक केले.
केवळ इमारतीची सुरक्षा न करता माणुसकी आणि नैतिक मूल्यांचेही रक्षण करणाऱ्या कृष्णकांत दातार यांच्या पाठीवर सोसायटीने कौतुकाची थाप मारत त्यांचा सत्कार केला. “माणुसकी आणि प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे,” अशा शब्दांत रहिवाशांनी त्यांच्या या कृतीला सलाम ठोकला.