लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात सुरक्षारक्षकाचा ‘रुबाब’.

शिस्त आणि सुरक्षेचे उडाले तीन-तेरा!
तंबाखू चोळत ग्रीलवर ठिय्या; रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये संताप, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
लातूर | विशेष प्रतिनिधी दि. ११ लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (जीएमसी) कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा यंत्रणेचा उर्मट आणि बेजबाबदार चेहरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ज्यांच्या खांद्यावर रुग्णालयाच्या सुरक्षेची आणि शिस्तीची जबाबदारी आहे, तोच गणवेशधारी सुरक्षारक्षक नियमांची पायमल्ली करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खुर्चीवर अस्ताव्यस्त बसणे आणि चक्क रुग्णालयाच्या स्टीलच्या ग्रीलवर ठिय्या मारून तंबाखूजन्य पदार्थांची मजा लुटण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुरक्षा की ‘खाजगी अड्डा’?
शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून गंभीर रुग्ण उपचारासाठी येतात. आधीच आजारपण आणि मानसिक तणावात असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा देण्याऐवजी येथील सुरक्षारक्षक स्वतःचा रुबाब झाडण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या दृश्यांमध्ये संबंधित सुरक्षारक्षक कसलीही तमा न बाळगता स्टीलच्या ग्रीलवर पाय टाकून बसलेला दिसत असून, तंबाखू चोळत कर्तव्याचा पुरता बोजवारा उडवत असल्याचे स्पष्ट होते. आरोग्याचे मंदिर मानल्या जाणाऱ्या रुग्णालयातच तंबाखू सेवनाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याने, ‘कुंपणानेच शेत खाण्याचा’ हा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.

स्वच्छता आणि नियमांचा फज्जा
शासकीय नियमांनुसार रुग्णालय परिसर पूर्णपणे तंबाखूमुक्त आणि शांतता क्षेत्र असणे बंधनकारक आहे. रुग्णांना संसर्ग होऊ नये म्हणून जिथे स्वच्छतेचे कडक निकष हवेत, तिथेच सुरक्षारक्षक बिनदिक्कतपणे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत बसल्याने रुग्णालयातील शिस्तीचा पुरता फज्जा उडाला आहे. सुरक्षा रक्षकांना पुरवणाऱ्या कंत्राटदाराचे या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण उरले नाही का, असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
कारवाई होणार की पाठीशी घालणार?
या गंभीर प्रकाराची चित्रफीत आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ कागदावर सुरक्षा नियम दाखवणाऱ्या रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि सुरक्षा एजन्सीला जाब विचारावा, अशी मागणी जोर धरत आहे. आता रुग्णालय प्रशासन या बेजबाबदार सुरक्षारक्षकावर कारवाईचा बडगा उचलणार की नेहमीप्रमाणे डोळेझाक करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.