केक अन् फटाक्यांच्या झगमगाटाला फाटा!

११ वर्षांच्या वेदांतचा कुर्डुवाडीत आदर्श; मूकबधिर मुलांना भोजनदान देऊन वाढदिवस साजरा
कुर्डुवाडी (विशेष प्रतिनिधी) दि. १४ : वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, डीजेच्या तालावर थिरकणे अन् पैशांची उधळपट्टी करणे, अशा काळात अवघ्या ११ वर्षांच्या चिमुरड्याने समाजाचे डोळे उघडवणारा नवा पायंडा पाडला आहे. “पप्पा, माझ्या वाढदिवसाला आपण काहीतरी वेगळं करूया!” या वेदांत दत्तात्रय गुरव याच्या एका साध्या पण अंतर्मुख करणाऱ्या वाक्याने एका स्तुत्य उपक्रमाला जन्म दिला. या विचाराला तत्काळ पाठबळ देत विवेक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कुर्डुवाडी येथील मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना गोड भोजनदान करून वेदांतचा वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

अनेकदा वाढदिवसाच्या नावाखाली क्षणिक आनंदासाठी हजारो रुपये उधळले जातात. मात्र, इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच खरा वाढदिवस, हा परिपक्व विचार अवघ्या अकराव्या वर्षी कृतीत उतरवून वेदांतने समाजासमोर आदर्श ठेवला. अन्नाचा घास घेताना त्या मूकबधिर मुलांच्या चेहऱ्यावरील निष्पाप समाधान उपस्थितांचे डोळे पाणावणारे ठरले.

या प्रेरणादायी कार्यक्रमाला शेंद्री गावचे निर्भीड शिवसैनिक श्री. भीमराव घंदुरे आप्पा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रातील मान्यवर तसेच हिंदू पुरातन सभेचे अध्यक्ष श्री. महेश केदार यांनीही आवर्जून उपस्थिती लावून वेदांतच्या विचारांचे कौतुक केले. याप्रसंगी शाळेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल श्री. दत्तात्रय गुरव यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वृंद यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
लहान वयातच इतरांविषयी संवेदनशीलता आणि सामाजिक भान जपणारा वेदांत आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरला असून, त्याच्या या अनोख्या वाढदिवसाचे माढा तालुक्यासह संपूर्ण परिसरातून भरभरून कौतुक होत आहे.