पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रथमच सानुग्रह अनुदान मिळण्याची शक्यता.

महापौर रवी लांडगे यांची सकारात्मक भूमिका
यशवंतभाऊ भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्य लेखापरीक्षकांकडून आर्थिक पडताळणी सुरू
किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची राष्ट्रीय श्रमिक आघाडीची मागणी; सायंकाळपर्यंत अधिकृत निर्णयाची शक्यता
पिंपरी (विशेष प्रतिनिधी) दि. ६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांना यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच सानुग्रह अनुदान (बोनस) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापौर रवी लांडगे यांच्याकडे केलेल्या जोरदार मागणीनंतर प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक पावले उचलली आहेत. यासंदर्भात आज (दि. ६) सकाळी महापौर कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आर्थिक तरतुदींची पडताळणी करण्याचे आदेश मुख्य लेखापरीक्षकांना देण्यात आले असून, आज सायंकाळपर्यंत याबाबतची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
महापौर कार्यालयात आज सकाळी ११ वाजता कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढ, बोनस आणि सानुग्रह अनुदानासंदर्भात सविस्तर बैठक पार पडली. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच अहोरात्र राबणाऱ्या कंत्राटी कामगारांनाही महापालिकेने किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, असा ठाम आग्रह यशवंतभाऊ भोसले यांनी या वेळी धरला.
कंत्राटी कामगारांच्या कष्टाची जाणीव : महापौर रवी लांडगे
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “यशवंतभाऊ भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. महापालिकेचे आरोग्य, सुरक्षा आणि इतर अत्यावश्यक विभागांतील १० हजार कंत्राटी कामगार शहराच्या सेवेत मनापासून योगदान देतात. त्यांच्या कष्टांची महापालिकेला पूर्ण जाणीव आहे. या कामगारांना जास्तीत जास्त किती सानुग्रह अनुदान देता येईल, याबाबतचा आर्थिक हिशेब सादर करण्याचे निर्देश मुख्य लेखापरीक्षकांना दिले आहेत. दुपारी हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. कामगारांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”
पहिल्यांदाच संवेदनशीलता पाहायला मिळाली : यशवंतभाऊ भोसले.
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापौरांच्या या भूमिकेचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराचे युवा नेतृत्व म्हणून महापौर रवी लांडगे यांनी पहिल्यांदाच कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर खरी संवेदनशीलता दाखवली आहे. यापूर्वी अनेक आंदोलने झाली, मात्र अशी सहानुभूती कधी दिसली नव्हती. शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणाऱ्या या कामगारांना नियमानुसार बोनस आणि महापालिकेकडून किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळालेच पाहिजे. ज्या कंत्राटदारांकडून बोनसची रक्कम कामगारांपर्यंत पोहोचत नाही, त्यांचीही काटेकोर चौकशी होणे गरजेचे आहे.”
महापालिका प्रशासनाचा लेखा अहवाल समोर आल्यानंतर अनुदानाची नेमकी रक्कम किती ठरणार, याकडे आता संपूर्ण शहरातील कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे.