भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय – स्वामी गोविंद देव गिरी

मोशीतील इंद्रायणी घाटावर ‘छठ’ भक्तीचा महासागर; काशीच्या पुरोहितांची गंगा आरती अन् १५ हजार भाविकांची मांदियाळी
पिंपरी, दि. १५ नोव्हेंबर (प्रतिनिधी) :”भारतीय परंपरेत सूर्यनारायणाच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता-भगिनींची देवावर अढळ श्रद्धा असून त्यांच्या सद्गुणांमुळेच आपली भारतीय संस्कृती जपली गेली आहे. देवी सीता आणि सावित्री या आमच्या आदर्श आहेत. भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये खरोखरच अतुलनीय आहेत,” असे गौरवोद्गार अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे विश्वस्त स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी काढले.

विश्व श्रीराम सेनेच्या वतीने रविवारी (दि. १५) मोशी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर भव्य छटपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला १५ हजारांहून अधिक उत्तर भारतीय बंधू-भगिनींनी उपस्थिती लावली होती. यावेळी स्वामी गोविंद देव गिरी महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांनी स्वामीजींचे स्वागत केले. यावेळी स्वामी भरतानंद महाराज, आचार्य देशपांडे, नगरसेवक यश साने, कुंदन गायकवाड आणि निखिल बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

काशीच्या पुरोहितांची गंगा आरती अन् सामाजिक बांधिलकी या महोत्सवात पवित्र तीर्थक्षेत्र काशी येथून आलेल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात स्वामी गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते भव्य गंगा आरती करण्यात आली. या नयनरम्य सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. छठ मातेच्या भक्तिगीतांनी आणि महिलांच्या पारंपरिक छठ गीतांनी संपूर्ण इंद्रायणी काठ भक्तीच्या सागरात न्हाऊन निघाला होता. उत्सवासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश स्वामी गोविंद देव गिरी महाराजांकडे सुपूर्द केला.

’आपण सर्व भारतमातेचे पुत्र’ पुढे बोलताना स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, “याच पवित्र इंद्रायणी तीरावर आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीस्थ आहेत. माऊली म्हणजे आई आणि आपण सर्व भारतमातेचे पुत्र आहोत. देशातील सर्व माता कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी छठ मातेची पूजा करतात. या सर्व माता-भगिनींना मी वंदन करतो. आपण सर्वांनी अशीच भारतमातेची सेवा आणि देशाची प्रगती सुरू ठेवूया.” छठ माता सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, असे शुभ आशीर्वादही त्यांनी यावेळी दिले.