सांगवीत संविधानाच्या प्रास्ताविका तोडफोडप्रकरणी संतापाचा भडका.

काँग्रेसचे संविधान चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू!
दोषींवर गुन्हे दाखल करा अन् स्मारक पूर्ववत बसवा; मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही – नरेंद्र बनसोडे यांचा प्रशासनाला थेट इशारा
चिंचवड/सांगवी (प्रतिनिधी)दि. २२ : सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाला कथितरीत्या बेकायदेशीरपणे हटवून त्या ठिकाणी करण्यात आलेल्या विद्रुपीकरण आणि तोडफोडीच्या निषेधार्थ सांगवीत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि स्मारकाची पूर्ववत पुनर्स्थापना करावी, या मुख्य मागण्यांसाठी आज गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून काँग्रेस आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा खणखणीत इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिला आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईवर आंदोलकांचा घणाघात
आंदोलनाला संबोधित करताना शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, “संविधान चौकातील प्रास्ताविका स्मारक हटवून तोडफोड करण्याची घटना अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजीच या गंभीर प्रकाराबाबत पोलीस आयुक्तांना लेखी तक्रार दिली होती. तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत.”
सामाजिक आणि पुरोगामी संघटनांचा आंदोलनाला भक्कम पाठिंबा या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच शहरातील पुरोगामी, सामाजिक संघटना आणि शेकडो संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. संविधानाच्या अस्मितेवर झालेला हा आघात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत उपस्थित संघटनांनी लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व नागरिकांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
आंदोलनात प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बेमुदत ठिय्या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, पुरोगामी विचारवंत मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, सर्वहारा उत्कर्ष समितीचे बी. बी. शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शाहबुद्दीन शेख, शहर उपाध्यक्ष रवींद्र भोसकर, हरीश शिंदे, वीरेंद्र गायकवाड, संदीप शिंदे, सुरज माने, सदाशिव तळेकर, डेनिस देवनसन, नवीलाल मुल्ला, कबीर मोहम्मद, हिराचंद जाधव, हरीश डोळस, बाबा गायसमुद्रे, मिलिंद बनसोडे, देवदत्त रानवडे, अनिता साळवे, अनिता सोनवणे, रितिका शर्मा, महादेव वाळुंजकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.