परंदवाडीत नागरिकांच्या जीवाशी खेळ!

बंदिस्त वाहनात अवैध गॅस रिफिलिंगचा काळाबाजार उघड; ‘छावा’ने आणला भांडाफोड
सिलिंडरमधून १ ते २ किलो गॅस गायब; वजनकाट्यासह सिलिंडर शिरगाव पोलिसांत जमा, एजन्सीच्या भूमिकेवर संशयाची सुई
परंदवाडी (विशेष प्रतिनिधी) दि. ५ : मानवी वस्तीत सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून थेट फिरत्या बंदिस्त वाहनात घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैध रिफिलिंग करून काळाबाजार चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परंदवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, ग्राहकांच्या हक्काच्या सिलिंडरमधून चक्क १ ते २ किलो गॅस परस्पर चोरला जात असल्याचे रंगेहात पकडण्यात आले. छावा मराठा सेना आणि रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, संबंधित साहित्य पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नेमका काय आहे प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग गॅस एजन्सीच्या सिलिंडरची वाहतूक आणि घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या वाहनांमधून हा गोरखधंदा सुरू होता. चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या वाहनांमध्ये दाट मानवी वस्तीत अत्यंत धोकादायक पद्धतीने एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरला जात होता. थोडीशी चूकही संपूर्ण परिसरात भीषण स्फोटाला कारणीभूत ठरू शकली असती. हा संशयास्पद प्रकार निदर्शनास येताच छावा मराठा सेनेचे प्रदेश महासचिव सचिन भिसे आणि रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली.
काट्यात मोठा घोळ; १ ते २ किलो गॅसची उघड चोरी!
संबंधित ठिकाणी अधिकृत वजन मापक यंत्र आणि मोजणी साहित्य आणून जेव्हा वाहनातील भरलेल्या टाक्यांचे प्रत्यक्ष वजन करण्यात आले, तेव्हा उपस्थितांचे डोळे पांढरे झाले. अनेक सिलिंडरमध्ये निर्धारित वजनापेक्षा १ ते २ किलोग्रॅम गॅस कमी भरल्याचे उघड झाले. म्हणजे एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात होता, तर दुसऱ्या बाजूला मानवी वस्तीत स्फोटाची टांगती तलवार ठेवून रिफिलिंगचा काळाबाजार जोरात सुरू होता.साहित्यासह पोलिसांत धाव; आता कारवाईकडे लक्षया गंभीर प्रकारानंतर सचिन भिसे व सहकाऱ्यांनी घटनेच्या दिवशीच (२१ सप्टेंबर) अवैध रिफिलिंगसाठी वापरले जाणारे सिलिंडर, साहित्य आणि वजनकाटा शिरगाव पोलीस ठाण्यात जमा केला.
या संपूर्ण रॅकेटमध्ये केवळ डिलिव्हरी कर्मचारी सहभागी आहेत की संबंधित गॅस एजन्सीचे व्यवस्थापनही सामील आहे? हे अवैध गॅस सिलिंडर कोणाला विकले जात होते? बंदिस्त वाहनांमध्ये स्फोटक साहित्याची अवैध हाताळणी करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल होणार का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. शिरगाव पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग या ‘गॅस माफिया’वर काय कारवाई करतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.