‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा.

हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करणार!’
•पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून बाळासाहेब गोतारणे यांचे रणशिंग
•शिक्षक, विद्यार्थी आणि मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी निर्णायक लढ्याचा निर्धार
पुणे, दि. ६ ऑक्टोबर : “शिक्षण क्षेत्रातील जमिनी वास्तव आणि शिक्षकांच्या अडचणी केवळ खडू-फळा हाती धरणारा शिक्षकच संवेदनशीलतेने समजू शकतो. केवळ आमदारकी मिळवण्यासाठी नव्हे, तर शिक्षकांच्या हक्कांचा आवाज थेट विधान परिषदेत घुमवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा,” असा घणाघाती निर्धार महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब गोतारणे यांनी व्यक्त केला. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर थेट बोट ठेवत गोतारणे म्हणाले, “जुनी पेन्शन योजना, शाळांचे रखडलेले अनुदान, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि शिक्षकांवर लादला जाणारा गैरशैक्षणिक कामांचा अवाजवी बोजा हे प्रश्न आता केवळ चर्चेत ठेवून चालणार नाही. शिक्षकांनी आयुष्य भावी पिढी घडवण्यासाठी वेचले आहे, त्यांच्या म्हातारपणाची काठी हिरावून घेता येणार नाही. शिक्षकांच्या सेवा-सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी हा निर्णायक लढा असेल.”
‘ग्रामीण आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे हीच प्राथमिकता‘ केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण आणि मराठी माध्यमांच्या शाळा सक्षम करण्यावर गोतारणे यांनी भर दिला. “गावातील शाळा हे त्या परिसराच्या विकासाचे मुख्य केंद्र असते. विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून मराठी शाळांचे महत्त्व कमी होत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही अद्ययावत डिजिटल लॅब, क्रीडा साहित्य आणि कौशल्य शिक्षणाच्या संधी मिळाल्याच पाहिजेत. शाळा वाचल्या तरच शिक्षण टिकेल,” असे ते ठामपणे म्हणाले.
’फक्त प्रश्न मांडणार नाही, सोडवूनच दाखवणार’ विधान परिषदेतील भूमिकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सभागृहात केवळ प्रश्न मांडणे ही प्राथमिक पायरी आहे; शासन दरबारी पाठपुरावा करून ते तडीस नेणे ही लोकप्रतिनिधीची खरी परीक्षा असते. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील प्रत्येक घटकाशी थेट संवाद ठेवून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
”माझा विजय हा वैयक्तिक नसून शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि मराठी शाळांच्या सक्षमीकरणाचा विजय असेल. शिक्षणव्यवस्थेतील या परिवर्तनाच्या लढ्यात शिक्षकांनी पाठीशी उभे राहावे.”— बाळासाहेब गोतारणे (उमेदवार, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ)