अविनाश-विश्वजीत यांच्या सुरेल मैफिलीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा दिमाखदार समारोप.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रसिक मंत्रमुग्ध
पिंपरी (विशेष प्रतिनिधी) दि. १० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ची सांगता अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात झाली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या प्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांच्या संगीत मैफिलीने उपस्थित रसिकांना स्वरानंदाची अनोखी पर्वणी दिली. मराठी गीतांचा गोडवा, भावस्पर्शी शब्द आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांनी या सांस्कृतिक पर्वावर सुरेल मोहोर उमटवली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या संयोजनाखाली ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान शहरात विविध सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम राबवण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप अविनाश-विश्वजीत यांच्या विशेष मैफिलीने झाला.
‘मोगरा फुलला’ने सुरेल सुरुवात मैफिलीची सुरुवात ‘मोगरा फुलला’ या सुप्रसिद्ध रचनेने झाली. त्यानंतर ‘का कळेना’, ‘कधी तू’, ‘भेटला विठ्ठल’, ‘फूलवंती’चे शीर्षकगीत, ‘केव्हा तरी पहाटे’ आणि ‘ओल्या सांजवेळी’ या गीतांनी श्रोत्यांना भावविश्वात नेले. ‘फॅन्टॅस्टिक’, ‘मदनमंजिरी’, ‘साथ दे / तुला पाहता’ आणि ‘आदी तूच अंती तूच’ या गाण्यांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
संगीत, साहित्य आणि काव्याचा त्रिवेणी संगम मध्यंतरानंतरच्या सत्रात ‘आली ठुमकत नार छौ’ या लावणीसदृश रचनेपासून ते अविनाश यांच्या वाद्यवृंद सादरीकरणाने (इन्स्ट्रुमेंटल) रंग भरला. ‘कुसुमाग्रज… कविता… विश्वजीत’ या सादरीकरणातून कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितांमधील शब्दसामर्थ्य आणि भावाविष्कार उलगडला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘हृदयात वाजे समथिंग’, मंगेश पाडगावकरांची अमर रचना ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि ‘असा हा धर्मवीर’ या ट्रॅकने सभागृहात नवी ऊर्जा निर्माण केली. शेवटी ‘हंबीर तू’ या गीताने प्रेक्षागृहातील वातावरण भारावून टाकले. टाळ्यांचा कडकडाट आणि रसिकांच्या उत्साही प्रतिसादात अभिजात मराठी भाषा सप्ताहाला सुरेल पूर्णविराम मिळाला.