Uncategorized

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : समग्र परिवहन नियोजन आढावा; राज्य परिवहन महामंडळासोबत कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक

नाशिक प्रतिनिधी, दि. १ जानेवारी २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुलभ व सुरक्षित वाहतुकीसाठी करण्यात येणाऱ्या परिवहन नियोजनाचा आढावा घेण्यासाठी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने स्मार्ट सिटी मिशन कार्यालय, पंचवटी, नाशिक येथे आढावा बैठक पार पडली. ही बैठक कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीत परिवहन पायाभूत सुविधा, बस संचालन, मनुष्यबळ नियोजन तसेच तंत्रज्ञानाच्या वापरावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मेंद, महाव्यवस्थापक (सिव्हिल) दिनेश महाजन, उपमहाव्यवस्थापक (ऑपरेशन्स) चेतन हसबनिस, प्रादेशिक व्यवस्थापक (नाशिक विभाग) विजय गीते, विभागीय वाहतूक अधिकारी (प्रभारी), नाशिक किरण भोसले, विभाग नियंत्रक (नाशिक विभाग) सचिन क्षीरसागर, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), नाशिक चैताली भुसारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत प्रस्तावित पायाभूत कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्र्यंबकेश्वर, जव्हार फाटा, निमाणी, वणी, नाशिक महामार्ग आदी प्रमुख ठिकाणांवरील एसटी बसस्थानकांच्या नूतनीकरण व काँक्रिटीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे व लवकरच कार्यादेश देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सप्तशृंगी गड येथे भूसंपादन प्रक्रियेमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी अटींसह निविदा काढण्याच्या शक्यतेवरही चर्चा करण्यात आली.कुंभमेळा कालावधीतील बस संचालन योजनेचा आढावा घेताना सुमारे ४,५०० बसेस तैनात करण्याचे नियोजन असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. या बसेस अंतर्गत व बाह्य पार्किंग स्थळे तसेच कसबे सुकेणे, ओढा, खेरवाडी, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, इगतपुरी रेल्वे स्थानक आदी प्रमुख ठिकाणांवरून त्र्यंबकेश्वर व अंतर्गत पार्किंगपर्यंत भाविकांची वाहतूक करतील. बस तैनाती, मार्गनियोजन व सामग्री पुरवठा व्यवस्थापन याबाबतचे सूक्ष्म नियोजन एसटी महामंडळाच्या केंद्रीय स्तरावर करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.

मनुष्यबळ नियोजनाबाबत चर्चा करताना एसटी महामंडळाचे यांत्रिक व प्रशासकीय पर्यवेक्षण अधिकारी कुंभमेळ्याच्या सहा महिने आधी, जानेवारी २०२७ पासून नाशिक येथे नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक भौगोलिक परिस्थिती व कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षण व भूमिकानिश्चिती आधीच करण्यात येईल. बदली झाल्यासही नियुक्तीची सातत्यता राखण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.प्रत्येक विभागात स्वतंत्र सिंहस्थ कुंभमेळा कक्ष (सेल) स्थापन करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना स्थानिक पातळीवर कुंभमेळा कक्ष तात्काळ कार्यान्वित करून कुंभमेळा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास तसेच विभागीय आराखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मागील सिंहस्थ कुंभमेळ्यांचा अनुभव लक्षात घेऊन पूर्वी कुंभमेळ्यात कार्य केलेल्या निवृत्त राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मानधन अथवा करार पद्धतीने नियमानुसार सहभागी करून घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तसेच कुंभमेळा कालावधीत वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रवासी मागणी विश्लेषण व मार्गनकाशा तयार करण्याच्या शक्यतांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button