महात्मा फुले यांचा स्त्रीशिक्षणाचा विचार आजही मार्गदर्शक; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन

महापालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन
पिंपरी प्रतिनिधी , दि. ११ एप्रिल २०२५ – महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा जो पाया घातला, तो भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. त्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना ज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. आज स्त्रिया शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करत असून ही प्रगती महात्मा फुले यांच्या विचारांचेच फलित आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्य प्रशासकीय भवनात तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस तसेच स्मारकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महात्मा फुले यांचा त्याग, सामाजिक कार्य आणि समतेसाठी दिलेला लढा अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांचे संवर्धन करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि वाचन उपक्रमांच्या माध्यमातून या विचारांची रुजवण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महात्मा फुले यांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरात उभारण्यात येणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक हे समाजप्रबोधनाचे प्रेरणास्थान ठरणार असून ते लवकर पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.
“दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन”

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’ आणि ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी येथे ११ ते १५ एप्रिल दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे छायाचित्रांद्वारे दर्शन घडविण्यात येत असून त्यांच्या कार्याचा व सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा परिचय नागरिकांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.