Uncategorized

मावळमध्ये महिला पत्रकाराला धमकी; एनसीआर नोंद, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

इंदोरी, ता.22 मावळ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील इंदोरी परिसरात एका महिला पत्रकाराला फोनद्वारे अप्रत्यक्ष धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात असंज्ञेय गुन्हा (एनसीआर) दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रेखा बाळू भेगडे या तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून स्थानिक स्तरावर पत्रकारिता करतात. इंदोरी येथे १३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या यात्रेदरम्यान वर्गणी संकलनावरून निर्माण झालेल्या वादाचे वृत्तांकन त्यांनी ‘सतर्क महाराष्ट्र’ या यूट्यूब चॅनेलवर १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे काही घटक नाराज झाल्याचे समोर आले आहे.

तक्रारीनुसार, आरोपी ऋषी विठ्ठलराव शिंदे (रा. इंदोरी) याने थेट संपर्क न साधता ओळखीच्या व्यक्तीमार्फत धमकीचा संदेश पोहोचवला. “गावच्या भानगडीत पडू नको, नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा देत संबंधित पत्रकाराला समज देण्यास सांगण्यात आले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्यास गावात फिरू देणार नाही, अशीही धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

याशिवाय, यापूर्वी एका पत्रकाराला दिलेल्या धमकीचे उदाहरण देत “पत्रकारिता करू देणार नाही,” असा इशारा देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संबंधित महिला पत्रकार व त्यांच्या माध्यमाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

घटनेची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३५१(४) अंतर्गत एनसीआर नोंदवला आहे. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ८.१७ वाजता ही माहिती पोलीस ठाण्यात प्राप्त होताच जनरल डायरीत नोंद करण्यात आली.

दरम्यान, या घटनेमुळे मावळ तालुक्यातील पत्रकारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. स्थानिक स्तरावर सत्य घटनांचे वृत्तांकन करताना वाढता दबाव, धमक्या यामुळे मुक्त व निर्भय पत्रकारितेला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button