आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून मागासवर्गीयांमध्ये फूट पाडण्याचा डाव
सर्वोच्च न्यायालयाच्या आडून क्रिमिलेयर लादण्याचा प्रयत्न

माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांचा सरकारवर घणाघात
चिंचवड येथील ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदेत’ नेत्यांचा एल्गार
पिंपरी प्रतिनिधी | २९ जून २०२६ “सध्या मागासवर्गीयांच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली जाती-जातींमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जात आहेत. बहुतांश समाजाचा या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आडोसा घेऊन सरकार क्रिमिलेयरची अट लादण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार मागासवर्गीय समाजात फूट पाडणारा असून, आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदेचा याला ठाम विरोध आहे,” असे स्पष्ट आणि आक्रमक मत माजी आमदार व ज्येष्ठ नेते ॲड. जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदेत’ ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
केवळ एका जातीच्या मागणीसाठी उपवर्गीकरण नको!
ॲड. गायकवाड पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना ‘बॅकवर्ड’ (मागासलेला समाज) या शब्दाची निश्चित व्याख्या केली नव्हती. कारण प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी आहे आणि कोणत्या समाजाला मागास ठरवायचे, हा अधिकार त्या-त्या राज्य सरकारचा आहे. महाराष्ट्रात ५९ जाती ‘बॅकवर्ड’ प्रवर्गात येतात, तर इतर राज्यांत हा आकडा आणि जाती वेगवेगळ्या आहेत. असे असताना, केवळ एका जातीच्या मागणीवरून सरसकट आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे अत्यंत चुकीचे आहे आणि याला आमचा तीव्र विरोध राहील.”
महापुरुषांच्या विचारांचा विसर आणि विषमतेचे राजकारण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञा आणि ज्ञानाचा उल्लेख करत गायकवाड यांनी आठवण करून दिली की, त्यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर संसदेवर प्रभुत्व मिळवले आणि देशातील सर्व समाजाची पुनर्रचना केली. महात्मा जोतीराव फुले आणि मुक्ता साळवे यांनी २०० वर्षांपूर्वी ज्ञानाचे महत्त्व सांगून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. “आपल्याला जर देशाला एक सशक्त राष्ट्र बनवायचे असेल, तर जातींच्या पलीकडे जाऊन समतेचे तत्त्व अंगीकारले पाहिजे आणि आधी जाती नष्ट केल्या पाहिजेत. मात्र, सध्या विषमतेचे राजकारण केले जात आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भीमशक्तीचा एल्गार: प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या परिषदेत दलित, शोषित आणि मागासवर्गीय चळवळीतील अनेक प्रमुख नेत्यांनी एकत्र येत उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात कडक भूमिका घेतली. यामध्ये माजी नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ॲड. विवेक भाई चव्हाण (कोब्रा), वसंत दादा साळवी, ॲड. अंबादास बनसोडे, प्रा. केशव वाघमारे, बाळासाहेब भागवत, देवेंद्र तायडे, कपिल सरोदे, ॲड. अरविंद तायडे, विवेक बनसोडे, सुरेश निकाळजे आणि बापू गायकवाड आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
या भव्य परिषदेचे मुख्य आयोजक म्हणून ईश्वर कांबळे, ॲड. मिलिंद कांबळे, राहुल सोनवणे, नितीन कांबळे, प्रकाश बुक्तर, विनोद सरोदे, ॲड. नीलध्वज माने, प्रमोद क्षीरसागर, सुरेश गायकवाड आणि विकास साळवे यांनी चोख जबाबदारी पार पाडली. आरक्षणाच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही, असा निर्धार या परिषदेत करण्यात आला.