Uncategorized

‘इथे आमची जागा आहे’

काळेवाडीत पार्किंगवरून राडा; ‘इथे आमची जागा आहे’ म्हणत तरुणाला बेल्टने बेदम मारहाण, नाकाचे हाड केले फॅक्चर!

​काळेवाडी (HR News मराठी):गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन नराधमांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि पॅन्टच्या बेल्टने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना काळेवाडीत घडली आहे. या जीवघेण्या मारहाणीत तरुणाच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून, याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक मच्छिंद्र पांचाळ (वय २८ वर्षे, रा. रामनगर, रहाटणी, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रतिक शिंदे (वय २५ वर्षे), ऋषी क्षीरसागर (वय २४ वर्षे) आणि आकाश आडसुळ (वय २५ वर्षे, तिघेही रा. पवननगर, काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.​

नेमकी घटना काय घडली?​

दि. ३ जुलै २०२६ रोजी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी अभिषेक पांचाळ हे आपली होंडा शाईन मोटारसायकल काळेवाडीतील ज्योतीबा गार्डनच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात पार्क करत होते. यावेळी त्यांचे ओळखीचे असलेले तिन्ही आरोपी त्या ठिकाणी आले.​

तू इथे गाडी का पार्क केली? इथे आमची जागा आहे!” असे म्हणत आरोपींनी अभिषेक यांना अचानक अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अभिषेक यांनी याचा जाब विचारला असता वाद आणखी वाढला.​

बेल्टने केला नाकावर प्रहार!

​रागाच्या भरात आरोपी ऋषी क्षीरसागर आणि आकाश आडसुळ यांनी अभिषेक यांना पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान आरोपी प्रतिक शिंदे याने उद्दामपणाची सीमा गाठत स्वतःच्या पॅन्टचा चामडी बेल्ट काढला आणि तो अभिषेक यांच्या तोंडावर व पाठीवर जोरात मारला. हा प्रहार थेट नाकावर बसल्याने अभिषेक यांच्या नाकातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या नाकाचे हाड फॅक्चर (अस्थिभंग) झाल्याचे समोर आले आहे.​

काळेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल​

भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काळेवाडी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११७(२), ११५(२), ३५१(२)(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.​

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) नाईक निंबाळकर करत आहेत. गुंडगिरी आणि भाईगिरी करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर पोलीस आता काय कडक कारवाई करणार, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.​तपास अधिकारी संपर्क: पोउपनि नाईक निंबाळकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button